पिंपरी : खासगी आराम बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. ५) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास जगताप डेअरी येथे घडली.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखेडवरून भोसरीच्या दिशेने खासगी आराम बस येत होती. ही बस जगताप डेअरीजवळ आल्यावर बसमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी बसमध्ये सात प्रवासी होते.
चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही वेळेतच संपूर्ण बसने पेट घेतला. याबाबत पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलास माहिती मिळाल्यावर रहाटणी येथील बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी बसला लागलेली आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.