रेल्वे स्टेशनवर पाणी, ट्रेन चार्जिंगच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश
लातूर : प्रतिनिधी
रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी लातूर आणि हरंगूळ रेल्वे स्टेशनवरील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आले असता खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनीही या वरिष्ठ अधिका-यांसोबत विकास कामांची पाहणी करून या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच स्टेशनवर पाण्याची, ट्रेन चार्जिंग, प्लॅटफॉर्म शेड, बेंचेस, स्वच्छतागृहांची सोय करण्याचे निर्देशही खासदारांनी दिले.
लातूर रेल्वे स्टेशन व हरंगूळ रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वे सोलापूर येथील स्थापत्य विभाग, अमृत भारत स्टेशन योजना आणि गती शक्ती विभागाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार, वरिष्ठ विभागीय अभियंता सचिन गणेर आणि लातूरचे सहायक विभागीय अभियंता अजय सिंह लातूर येथे आले होते. त्यावेळी खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी मराठवाडा जनता विकास परिषद व दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीच्या सदस्यांसह लातूर स्टेशनला सदिच्छा भेट दिली आणि चालू असलेल्या स्थापत्य विभागाच्या कामाचा, नूतनीकरणाचा आढावा घेतला. यावेळी मराठवाडा जनता विकास परिषद व दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे शिवाजीराव नरहरे, समीर पडवळ, डॉ. भास्करराव बोरगावकर, डॉ. भास्करराव पाटील, सुपर्ण जगताप, सौ. पूजा येलगट्टे रेड्डी आदींचा समावेश होता.
लातूर रेल्वे स्टेशनचे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नूतनीकरणाचे काम चालू आहे. प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली आहे, जेणेकरून २४ बोगीवाल्या मोठ्या रेल्वेगाड्या थांबू शकतील, असे यावेळी सांगण्यात आले. फेज १ च्या कामामध्ये प्लॅटफॉर्म नंबर १ वर विद्युत पर्याय व उद्वाहकचे काम चालू आहे. माल धक्क्याचे शेड प्लॅटफॉर्म नंबर ४ वर स्थानांतरित करण्याचे काम चालू आहे. तसेच लातूर स्टेशनवर पीट लाइनचे काम चालू आहे, त्याचा यावेळी आढावा घेण्यात आला.
लातूर रेल्वे स्टेशनवर फेज २ मध्ये स्टेशन बस स्टँड अणि बँक एटीएमची पण तरतूद करून ठेवली आहे, असे सांगितले. तसेच भविष्यात प्लॅटफॉर्म वाढविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच हरंगूळ स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची लांबी, उंची अणि रुंदी वाढवण्याबद्दल विचारले असता त्याचे मोजमाप घेतले आहे. लवकरच या कामाचे टेंडर निघेल, असे अधिका-यांनी सांगितले.
लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू होणार
लातूर स्टेशनवरील प्रवेशद्वार मोठे करण्यात आले. प्रवेशद्वार शेड देण्यात आला. सीमेंट रोड करण्यात आला. पीयूपीप्लाइटिंगचे काम चालू आहे. वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठीची पूर्तता आहे का, याची चौकशी केली. तसेच लवकरच वंदे भारत ट्रेन चालू होईल, अशी ग्वाही देण्यात आली.