सोलापूर : नळदुर्ग-सोलापूर बसमधून प्रवास करीत असताना खेळणी विकणारी महिला शेजारी बसली. तिने हातसफाई दाखवून पर्समधील लहान बॅगेतील ३ लाख ८१ हजार ७५० रुपयांचे दागिने पळवून धूम ठोकली. सोलापूरच्या बस स्थानकात ही घटना घडली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुवर्णा तुकाराम पाटील (वय ४९, रा. साई निवारा सोसायटी, राजगुरूनगर, ता. खेड) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्याने गुन्हा नोंदला आहे. यातील फिर्यादी या ९ डिसेंबर रोजी नळदुर्गहून सोलापूरकडे प्रवास करीत होत्या. बस सोलापूर स्थानकात आल्यानंतर खेळणी विकणारी महिला आत आली व फिर्यादीच्या सीटजवळ आल्यानंतर तिने खेळणी पाडली व ती उचलण्याचे निमित्त करून फिर्यादीच्या मांडीवरील बॅग साईडला ठेवण्यास सांगितली.
दरम्यान, तेथे गोंधळ करून बॅगच्या बाहेरील कप्प्याची चेन उघडून आतील कापड धारदार हत्याराने फाडले. आतील लहान वरील रकमेचे दागिने असलेली बॅग चोरून नेली. घरी गेल्यानंतर फिर्यादीच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली. दागिन्यांची बॅग न सापडल्याने अखेर फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पुढील तपास सपोनि धायगुडे करीत आहेत.