गडचिरोली पोलिस मुख्यालयासमोर केले आत्मसमर्पण
गडचिरोली : प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील ३८ वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेली जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह ११ नक्षलवाद्यांनी बुधवारी गडचिरोली पोलिस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. त्यात १ डीकेएसझेडसीएम, ३ डीव्हीसीएम, २ एसीएम व ४ दलम सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ८६ लाख ५ हजार रुपयांचे बक्षीस होते. यावेळी नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला.
दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तारक्का ही मागील ३८ वर्षापासून नक्षल चळवळीत होती. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची ती पत्नी आहे. तिच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. विमला चंद्रा सिडाम उर्फ तारक्का उर्फ वत्सला उर्फ तारा डीकेएसझेडसीएम, सुरेश उईके उर्फ चैतू उर्फ बोटी, डीव्हीसीम कुतुल एरिया कमिटी व त्याची पत्नी कल्पना गणपती तोर्रेम उर्फ भारती उर्फ मदनी (डीव्हीसीएम), अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश डीव्हीसीएम राही दलम व त्याची पत्नी सम्भ पांडू मट्टामी उर्फ बंडी (एसीएम डी. के. झोन डॉक्टर टीम), वनिता सुकलू धुर्वे उर्फ सुशीला (एसीएम भामरागड दलम), निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमिली दलम, श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना, सदस्य कंपनी क्रमांक १०, शशिकला पतीराम धुर्वे पश्चिम सबझोनल प्रेस टीम सदस्य, सोनी सुक्कू मट्टामी राही दलम सदस्य, आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर ३२ यांचा आत्मसमर्पण करणा-यांमध्ये समावेश आहे.
नक्षली चळवळीतील
अनेकजण मुख्य प्रवाहात
संविधानविरोधी आणि देशविरोधी कृत्यामुळे आपला विकास होत नाही, हे नक्षलवाद्यांच्या लक्षात आल्यामुळे अनेक जण देशाची व्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहात येत आहेत, असे फडणवीस म्हणाले. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग करीत असलेल्या विकासकामांमुळे मागील ४ वर्षात नक्षल चळवळीत एकही नवीन भरती झाली नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.