लातूर : सिध्देश्वर दाताळ
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठ सजली असून विविध रंगांच्या माळा, हार, मखर सजावटीच्या साहित्यांनीही दुकाने बहरली आहेत. त्यामुळे, विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी नागरिक बाजारात गर्दी करत आहेत.
लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत विघ्नहर्त्या गणरायाचे शनिवारी घरोघरी आगमन होत आहे. या पार्श्वभूमिवर गेल्या आठ ते दहा दिवसापासून बाजारपेठेत चैतन्य अवतरले आहे. मागील चार-पाच दिवसापासून बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे सायंकाळी पाचनंतर बाजारात ग्राहक मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. गणरायाची आरस सर्वाेत्तम आणि आकर्षक व्हावी यासाठी शहरातील विविध भागात सजावटींचे साहित्य विकण्यासाठी व्यापा-यांनी स्टॉल उभारले आहेत. गणपती सजावटीसाठी विविध रंगांच्या माळा, हार, मखर, झिरमळ्या, विद्युत दिवे, कृत्रिम फुलांचे तोरण आदी साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे. अवघ्या तीन-चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी शहरातील बाजारपेठा विविध रंगी, विविध प्रकारच्या वस्तूंनी फुलून गेल्या आहेत. शहरातील विविध स्टॉल्स फुलांच्या तसेच विजेच्या माळा, सजावट साहित्यांनी सजलेले दिसत आहेत. आपल्या लाडक्या बाप्पांच्या साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांची बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे.
शहरातील बाजारपेठेत मखराचे साहित्य, रंगीबिरंगी विविध प्रकारच्या विद्युत माळा, विद्युत समई, पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी तबक, आकर्षक नक्षीकाम असलेले पूजेचे साहित्य ठेवण्याचे पात्र, प्लॅस्टिकच्या फुलांचे आकर्षक हार, विविध आकारांची विविधरंगी फुले, अगरबत्ती, धूप, रांगोळीचे छाप, ज्योतीच्या वाती, रांगोळीचे विविध रंग, अस्तर, गणेश भक्तांच्या आवडीनुसार सुंदर, उपरणे, चांदीचे मोदक, दूर्वा, कंबरपट्टा, मूषक, चंदनहार अशा प्रकारचे साहित्य बाजरात दाखल झाले आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून गणेशभक्तांची गर्दी होऊ लागली आहे.
गुलाबी, पिवळा, लाल रंगाच्या हाराला बाजारात पसंती मिळत आहे. बाजारात या हारांची किंमत १०० रुपयांपासून पुढे आहे. मण्यांचे हार वेगवेगळया डिझाईनमध्ये बाजारात उपलब्ध झाल्या असून यांची किंमत १०० ते ५०० रुपयांपर्यंत आहे. किरकोळ विक्रेते शंभर रुपयाला दोन माळा या किमतीत विक्री करत आहेत. बाप्पासाठी आकर्षक आसन विविध आकारानुसार उपलब्ध असून त्याच्या किंमती २० ते ५० रूपये आहे. त्यामुळे त्याची किंमत आवाक्यात आहेत. मोत्यांच्या कंठयादेखील विविध डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. मोत्यांच्या कंठयाप्रमाणे विविध रंगांच्या खडयांच्या कंठया, १ फुटांच्या मूर्तीपासून अगदी मोठया मूर्तीपर्यंत मोत्यांच्या कंठयाचे हार बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्याची ५० रूपयांपासून ते २ हजार रूनयांपर्यत आहे.