बीजिंग : वृत्तसंस्था
गलवान, पूर्व लडाखसह चार ठिकाणांवरून चिनी सैनिकांना हटविण्यात आल्याची माहिती चिनी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे काल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी एकजुटीने काम करण्यावर एकमत झाले होते. त्यानंतर आज त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.
सीमेवरील सैनिकांना मागे हटविण्यासाठी भारत आणि चीनमध्ये मतैक्य झाले होते. त्यानंतर यासंबंधी माहिती देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी गलवान, पूर्व लडाखसह चार क्षेत्रातील चीनचे सैनिक मागे हटविण्यात आले आहेत. यासोबतच भारताचे सैनिकही मागे हटविण्यात आले आहेत, असे सांगितले. सीमेवरील स्थिती पूर्णत: नियंत्रित आणि स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले.