उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील कुमठा (खु) येथील एका १४ वर्षीय शाळकरी मुलाचा खून झाल्याची घटना शनिवारी दि.१३ रोजी दुपारच्या वेळेस उघडकीस आली होती. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून एकास ताब्यात घेतले होते. दरम्यान त्या आरोपीने खुनाची कबुली दिली असून मयत मुलाने आरोपीचा मोबाईल चोरल्याच्या संशयातून गांजा व दारूच्या नेशत त्याचा खून केल्याची कबुली आरोपी किरण ज्ञानोबा देवनाळे उर्फ खराबे रा. पिंपरी, ता. उदगीर याने पोलिसांना दिली आहे.
कुमठा (खु) येथील १४ वर्षीय मुलाचा खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्याच गावात एका शेतक-याकडे सालगडी म्हणून काम करणारा किरण ज्ञानोबा देवनाळे वय २८, रा. पिंपरी ता.उदगीर यास संध्याकाळी ताब्यात घेण्यात आले होते. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. या खुनात वापरलेला फावडयाचा दांडा ब्लेड कटर मयत मुलाचा मोबाईल घड्याळ आरोपीकडून पोलीसांनी जप्त केला आहे.
आरोपीचा मोबाईल मयत मुलाने चोरल्याचा संशय आल्यावरून बुधवारी रात्रीच्या सुमारास मयत संतोष गोविंद घुगे हा त्याच्याकडे आला असता त्या दोघांत मोबाईल चोरीवरून कुरबुर झाली. दोघांनीही बसून गांजा व दारू सेवन केली. यानंतर सालगड्याने मयताच्या पाठीत खो-याच्या दांड्याने वार केले तो मुलगा कोसळला त्यानंतर सालगडी तेथून निघून गेला थोड्या वेळानंतर तो तेथे पुन्हा आला असता त्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सालगड्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर सालगडी तेथून परत शेतीकडे गेला व पुन्हा गांजा व दारूचे सेवन करुन मयताकडे रात्री अडीचच्या सुमारास आला व सोबत आणलेल्या दाढी करण्याच्या खो-याने त्याचे केस काढले व त्या ब्लेडने चेहरा विद्रुप करून मृतदेह चंद्रभान केंद्रे यांच्या शेतातील नालीत टाकला.