येरुसलेम : वृत्तसंस्था
इस्रायलने रविवारी (६ ऑक्टोबर) गाझा पट्टीतील मशिदीवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किमान २४ जणांचा मृत्यू झाला असून ९३ जण जखमी झाले आहेत. पॅलेस्टाईन वृत्तसंस्था ‘वाफा’ने यासंदर्भात माहिती दिली आहे
मध्य गाझा पट्टीतील दीर अल-बलाहमध्ये अल-अक्सा रुग्णालयाजवळील मशिदीवर हा हल्ला झाला.
या हवाई हल्ल्यासंदर्भात इस्रायली लष्कराने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, दीर अल बलाह भागात शुहादा अल-अक्सा मशिदीत उपस्थित असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांवर बिनचूक हल्ला करण्यात आला. हे दहशतवादी येथून कमांड आणि कंट्रोल सेंटर चालवत होते.
गाझातील धार्मिक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायच्या हल्ल्यात गाझातील १,२४५ मशिदींपैकी ८१४ मशिदी नष्ट झाल्या आहेत. तर १४८ मशिदींचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय तीन चर्च देखील नष्ट झाल्याचे या निवेदनात म्हणण्यात आले आहे. याशिवाय, ६० पैकी १९ स्मशानभूमींनाही जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले आहे. मंत्रालयाच्या संपत्तींचे अंदाजे ३५० मिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे.