जळगाव : प्रतिनिधी
जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघांकडूनही सातत्याने एकमेकांवर कुठले न् कुठले आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मात्र एकनाथ खडसे यांनी यावेळी गिरीश महाजन यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
पत्रकार अनिल थत्ते यांनी व्हायरल केलेल्या क्लीपच्या आधारावर खडसे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिका-यासोबत संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही याबाबतची कल्पना असून आपण त्यांना यासंबंधी भेटून विचारणा करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी एक क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’ त्यात त्यांनी म्हटले आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिका-यासोबत संबंध आहेत. त्या महिलेचे नाव देखील मला माहीत आहे, मात्र ते नाव सांगणे उचित होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बैठक झाली त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलवून घेतले होते.
अमित शहा यांनी स्वत: गिरीश महाजन यांना याबाबत विचारणा केली होती. त्यावर महाजन यांनी सांगितले की, माझे कामानिमित्त ब-याच अधिका-यांशी बोलणे सुरू असते. पण शहांनी त्यांना सांगितले की, तुमचे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहेत. त्यावर रात्री एक वाजेनंतरही तुमचे कॉल झालेले दिसत आहेत. दिवसभरात शंभर-शंभर वेळा कॉल झालेले आहेत. सीडीआर खरं बोलत आहे. त्या महिलेशी तुमचा काय संबंध? असे थेट अमित शहा यांनी महाजन यांना सुनावल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी अनिल थत्ते यांच्या क्लीपचा हवाला देत केला.
एकनाथ खडसे म्हणाले, माझ्या अमित शहांसोबत भेटीगाठी होत असतात. मी त्यांना भेटून याबाबत चर्चा करणार आहे. मला वाटते की खरोखर गिरीश महाजन यांचे दहा वर्षांचे मागचे रेकॉर्ड तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी फोडलेल्या या नव्या बॉम्बमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर महाजन विरुद्ध खडसे ही लढाई अधिक तीव्र होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर गिरीश महाजन काही स्पष्टीकरण देतात का तेही पाहावे लागणार आहे.