16.8 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रगुंतवणुकदारांनी सरकारच्या भरवशावर राहू नये

गुंतवणुकदारांनी सरकारच्या भरवशावर राहू नये

नागपूर : प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमी राजकीय विषयांवर स्पष्टपणे बोलतात. त्यातच आता त्यांनी आणखी एक विधान केले आहे ज्याची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसून येत आहे. नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना गुंतवणुकदारांना गुंतवणुकदारांनी सरकारच्या भरवशावर राहू नये, अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात , असे म्हणत मोलाचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी, माझं तर म्हणणं आहे की कोणत्याही पक्षाचं सरकार असूद्या. गुंतवणूकदारांनी सरकारला बाजूला ठेवलं पाहिजे. सरकार हे विषकन्या असते. ज्यांच्या बरोबर जाते त्यांना बुडवते. तुम्ही त्यांच्या भरोशावर राहू नका. तुम्हाला अनुदान घ्यायचं आहे घ्या. मात्र, अनुदान कधी मिळेल, कधी नाही याचा काहीही भरोसा नसतो. असे म्हणत त्यांनी वेगळ्याच चर्चांना खतपाणी घातले आहे.

पुढे बोलताना त्यांनी, एका जणाने सांगितले की साडेचारशे कोटी अनुदान आले आहे. टॅक्सचे पैसे जमा आहेत. पुढे त्यांनी विचारलं की पण ते पैसे कधी मिळतील? मी त्यांना म्हटलं परमेश्वराला प्रार्थना करा. कारण काही भरोसा नाही. मग मिळणार का? जेव्हा येईल तेव्हा मिळू शकतात. अनुदानाचे पैसे मिळतील का? याची शाश्वती नाही. कारण लाडकी बहीण योजनेतही पैसा द्यावा लागतो, असेही म्हटले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली होती. जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत् , असं राज ठाकरे म्हणाले होते. यातच आता भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासंदर्भात एक विधान करत ‘गुंतवणुकदारांना अनुदानाचे पैसे मिळतील का? याची शाश्वती नाही. कारण लाडकी बहीण योजनेतही पैसा द्यावा लागतो , असं नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR