लातूर : प्रतिनिधी
अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्यानिमित्त साखर-खोबरेच्या हारांना मोठी मागणी असते. या सणाला साखरेच्या हारांची विशेष मागणी असते. गतवर्षाच्या तूलनेत यंदा साखर-खोबर हारांची बाजारात मागणी वाढल्यामुळे व्यापारी आणि कारखानदारांसाठी नवीन वर्षारंभाचा हा सण गोड होणार आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १० टक्के वाढ झाली असल्याचे व्यापारी वर्गानी सागीतले.
साखरहाराच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असले तरी सण तर साजरा करावाच लागत असल्यामुळे साखरच्या हाराला नागरीक पसंती देत आहेत. साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखर हारांना अधिक महत्त्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. गेली दोन वर्षापासून नागरीकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच महागाई वाढल्याने साखर आणि कामगारांच्या मजुरीत वाढ झाल्याने यंदा साखर हाराच्या दरात सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे व्यावसायिकांनी सागितले.
गतवर्षापासून महागाईने उच्चांक गाठला असून त्याचा फटका लातूरमधील साखर हार तयार करणा-या व्यवसायिकांना बसला आहे. साखरेबरोबरच इतर कच्या मालाच्या दरातही वाढ झाली आहे. त्यातच गुजरात, सोलापूर, बार्शी, कळंब येथून आलेल्या साखर हारांचा ही स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. शहराच्या बाजारपेटेत साखर हार १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. तर ठोकमध्ये ७० ते ८० रुपये किलो या दराने विकले जात आहे. येथे तयार झालेले हार शहर व ग्रामीण भागात विक्री होते. बाजारात या हारांना मागणी वाढली आहे. अशी माहिती किशोर लाड यांनी एकमतशी बोलताना दिली.