कराड : प्रतिनिधी
स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. विंग (ता. कराड) येथे रविवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, सिलिंडरच्या स्फोटानंतर घराला आग लागली. यात सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
विंग येथील पाणंद नावच्या परिसरात तानाजी पांडुरंग कणसे यांचे राहते घर आहे. त्यांच्या घरात रविवारी सकाळी आठच्या सुमारास स्वयंपाक सुरू असताना अचानक धूर येऊ लागला. घरात असलेले तानाजी कणसे, त्यांची पत्नी, दोन मुले व वृद्ध आई घरातून बाहेर पळाले. त्यानंतर काही वेळातच सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, यामध्ये सिलिंडर तब्बल २५ फूट हवेत उडाले. या घटनेनंतर तलाठी फिरोज आंबेकरी, क्लार्क संजय पाटील व अमोल चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला. यामध्ये तब्बल सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कणसे यांचे घर जळून खाक झाले होते. या आगीत रोख रकमेसह सोने व संसारोपयोगी साहित्य जळून मोठे नुकसान झाले. वेळीच घरातील सर्वजण बाहेर पळाल्याने मोठा अनर्थ टळला.
स्वयंपाकाचा गॅस म्हणजेच एलपीजी केवळ घरे आणि हॉटेल्सचा भाग नाही, तर तो रस्त्यावरील भोजनालये, कारखाने, मॉल्स व कॅन्टीन असलेल्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये सर्वव्यापी आहे. अनेकांना गॅस सिलिंडरच्या सुरक्षित वापराविषयी माहिती नसल्यामुळेदेखील अशा घटना घडतात.