22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeसंपादकीय विशेषगेमचेंजर की बूमरँग?

गेमचेंजर की बूमरँग?

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय हा इंदिरा गांधींच्या आणीबाणीचा वारसा लाभलेल्या इंडिया आघाडीमध्ये फूट पाडण्याचा एक प्रयत्न आहे. तथापि, येणा-या विधानसभा निवडणुकांमध्ये हा निर्णय बूमरँग ठरण्याची शक्यता आहे. ‘मार्मिक’च्या ‘संपादकीय’मध्ये शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात राजकीय अशांततेनंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी आणीबाणी लादणे हा एकमेव पर्याय असल्याचे लिहिले होते. इंदिराजींचे विश्वासू सहाय्यक एच. वाय. शारदा प्रसाद यांचे पुत्र रवी विश्वेश्वरय्या शारदा प्रसाद यांच्या मते, आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इंदिरा गांधी यांच्यात अनेक संवाद झाले होते. त्यामुळे या विषयाच्या सखोल चर्चांना फोडणी मिळाल्यास मोठी घुसळण होण्याची शक्यता आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने २५ जून रोजी देशभरात ‘संविधान हत्या दिवस’ पाळण्याचा घेतलेला निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असून या माध्यमातून तत्कालीन काळात आणीबाणीला विरोध करणा-या पण आता ‘इंडिया’ आघाडीत असणा-या नेत्यांत दुही निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. अर्थात भाजपने सुरुवातीपासूनच आणीबाणीला तीव्र विरोध केला आहे. पण केंद्र सरकारने संविधान हत्या दिवस पाळण्याचा घेतलेला निर्णय प्रामुख्याने महाराष्ट्रात अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात तीन महिन्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. आणीबाणीविरोध हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या एका गटाला अडचणीत आणू शकतो. आणीबाणीच्या कालावधीचा बारकाईने अभ्यास केला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इंदिरा गांधी यांना प्रस्थापित करणा-या यंत्रणा यांच्यात झालेल्या छुप्या सहमतीवर प्रकाश पडू शकतो. आणीबाणीच्या काळात देशातील काही नेत्यांना एक प्रकारे अभय दिले होते. या निवडक नेत्यांत इंदिरा गांधी यांच्याशी संघर्ष करणा-या भाजपच्या संस्थापक सदस्या राजमाता विजयाराजे शिंदे यांचा उल्लेख करावा लागेल.

३१ ऑगस्ट १९७५ च्या ‘मार्मिक’च्या ‘संपादकीय’मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले, की राजकीय असंतोषाचा भडका शमविण्यासाठी आणि परिस्थिती सांभाळण्यासाठी इंदिरा गांधी यांच्यासमोर आणीबाणी हाच एकमेव पर्याय होता. म्हणूनच की काय १९८० मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने काँग्रेसविरुद्ध उमेदवार उभा केला नव्हता. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना ‘महान माता’ अशी उपाधी दिली. स्तंभलेखक वीर संघवी एकदा म्हणाले होते, की मुंबईत केवळ एकच महानायक आहे आणि ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. ठाकरे यांनी निवडणूक न लढविता राजकारणात मोठी हुकुमत निर्माण केली. तीन दशकांपेक्षा अधिक काळ बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारण, व्यवसाय आणि बॉलिवूडवर अधिराज्य गाजविले.

इंदिरा गांधी यांचे विश्वासू सहायक एच. वाय. शारदा प्रसाद यांचे चिरंजीव रवी विश्वेश्वरय्या शारदा प्रसाद यांच्या मते, आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इंदिरा गांधी यांच्यात अनेकदा चर्चेच्या फे-या झाल्या. त्यांच्या दाव्यानुसार नोव्हेंबर १९७६ मध्ये संघाने मध्यस्थी केल्यानंतर इंदिरा गांधी सरकारने संघाच्या अनेक नेत्यांची सुटका केली. यावेळी कागदपत्रांवर माझ्या वडिलांनी म्हणजेच एच. वाय. शारदा प्रसाद यांनी सोपस्कार पार पाडले, असा दावा रवी विश्वेश्वरय्या शारदा प्रसाद यांनी केला. आपले पुस्तक ‘लास्ट महाराणी ऑफ ग्वाल्हेर – अ‍ॅन ऑटोबायोग्राफी (मनोहर मुलगावकर यांचे संपादन) मध्ये उल्लेख केल्यानुसार त्यांची कन्या उषा आणि वसुंधरा यांनी राजमातांना कारवाईपासून दिलासा मिळण्यासाठी आणि त्यांच्या सुटकेसाठी इंदिरा गांधी यांच्याकडे किती चकरा मारल्या याचा उल्लेख केला आहे. राजमाता यांच्या दाव्यानुसार, इंदिरा गांधी यांच्या एका निकटवर्तीयाने द्वयर्थी शब्दांत भाष्य केले आणि ते ग्वाल्हेरच्या राजमातांना धक्कादायक होते. वसुंधरा यांनी आईची सुटका करण्यासाठी काय काय त्याग करण्याची तयारी दाखविली होती. राजकीय वर्तुळात वावरणा-या ज्या व्यक्तीने (आता मृत) वसुंधरा राजे यांच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला ती व्यक्तीही कालांतराने कळून चुकली. परंतु हाती कोणताही पुरावा नसल्याने त्याचे नाव कदाचितच समोर आले असेल.

आणीबाणीच्या काळात त्या व्यक्तीने माध्यम आणि बॉलिवूडच्या अनेक मातब्बर कलाकारांना त्रास दिला होता. याशिवाय त्यांच्या बाजूने माधवराव शिंदे यांचे नेपाळच्या मंत्रिमंडळात मंत्री असणारे मेहुणे यांनीही इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण उलट त्यांना भारतात परतण्याचे आणि राजकारण सोडून देण्याचे सांगितले गेले. इंदिरा गांधी आणि संजय गांधी हे माधवरावांच्यात राजकीय भविष्य म्हणून पाहत होते. तत्कालीन काळात महाराजा राहिलेल्या व्यक्तीला जनसंघाचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रभावी शस्त्र म्हणून पाहिले जात होते आणि दुसरीकडे राजमाता आणि त्यांच्या पक्षाचे वलय कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल, या दृष्टीने पाहिले जात होते.

माधवराव शिंदे यांनी १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून जिंकली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. मागे वळून पाहिल्यास राजमातांना २१ महिन्यांची आणीबाणी संपेपर्यंत तुरुंगात राहण्यापासून बचाव करण्यासाठी एक मध्यममार्ग काढण्यात आला. त्यासाठी एक अलिखित करार करण्यात आला. तो म्हणजे त्यांनी राजकारणाचा त्याग करावा. इंदिरा गांधी यांचे सहकारी दिवंगत आर. के. धवन हे नेहमीच खासगीत बोलताना यासंदर्भात बोलत; पण याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्याचे मान्य करायचे. ‘इंडिया टुडे’त काम करणारे भोपाळचे ज्येष्ठ पत्रकार एन. के. सिंह आणि तरुण कुमार भादुरी (‘स्टेट्समन’चे पत्रकार आणि अमिताभ बच्चन यांचे सासरे) हे आर. के. धवन यांना नेहमी भेटायचे आणि या भेटीत धवन यांनी मांडलेल्या मतात तथ्य वाटायचे.

१९७७ मध्ये आणीबाणी हटविली. काही महिन्यांनंतर १ जुलै रोजी तरुणकुमार भादुरी यांनी भोपाळमध्ये राजमाता यांची भेट घेतली. तेव्हा इंदिरा गांधी या सत्तेत नव्हत्या आणि विरोधी पक्षांचे आघाडीचे जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले होते. एकदा राजमातांना त्यांच्या भविष्याविषयी विचारले असता तेव्हा त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की, नाही, नाही, मी आता राजकारणात नाही. मी हताश नाही, परंतु राजकारण आणि राजकीय नेत्यांचा मी तिरस्कार करते. इतक्या खालच्या पातळीवर ते घसरू शकतात, याचा कधी मी विचारही केला नव्हता. राजकारण माझा प्रांत नाही, असे त्यांनी सांगितले. तेव्हा भादुरी यांनी विचारले की, राजकारण सोडण्यासाठी तुमच्यावर दबाव आला होता का? तेव्हा त्यांनी हे खरे नाही असे सांगत मी तुरुंगात खितपत पडले होते. मी शारीरिकदृष्ट्या हतबल झाले होते. बाहेरचे जग नुसते बघ्याची भूमिका घेत होते आणि काहीच करत नव्हते, अशा शब्दांत उत्तर दिले.

इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर राजीव गांधी यांनी कथितरीत्या सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासमवेत गुप्त बैठक घेतली. त्यामुळे भाजप राजकारणात सक्रिय असतानाही संघाने १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला. राजीव गांधी यांनी बाळासाहेब देवरस यांचे लहान बंधू देवरस यांच्याशी पाच ते सहा वेळा वेगवेगळ्या ठिकाणी भेट घेतली. त्यात ४६, पुसा रोड, नवी दिल्ली, कौटुंबिक मित्र आणि मद्य व्यावसायिक कपिल मोहन यांच्या घराचा देखील उल्लेख करावा लागेल. त्यांचे अलिकडेच निधन झाले. राजीव गांधी यांचे सहकारी अरुण सिंह, दिल्लीचे महापौर सुभाष आर्य, संपर्कप्रमुख अनिल बाली हे यावेळी उपस्थित होते. राजीव गांधी यांनी बाबरी मशिद-रामजन्मभूमीचे कुलूप उघडावे आणि सरकारी माध्यम टीव्ही दूरदर्शनवर रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेच्या प्रसारणाची परवानगी द्यावी यावर उभयतांत चर्चा झाली.

ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसला संघाने पाठिंबा दिला. संघाचे ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांनी एका लेखात त्यासंदर्भात मत मांडले आहे. २५ नोव्हेंबर १९८४ रोजी हिंदी पाक्षिक ‘प्रतिपक्ष’मध्ये‘ मोमेंट ऑफ सोल सर्चिंग’ मध्ये देशमुख यांनी लेखाच्या शेवटी राजीव गांधी यांना आशीर्वाद देण्याचे अणि सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी मतदानाला एक महिन्यापेक्षा कमी काळ राहिला होता. नानाजी देशमुख यांनी इंदिरा गांधी यांचे वर्णन ‘भारताच्या इतिहासातील एक महान हुतात्मा’ म्हणून केले. धैर्य आणि कौशल्याच्या बळावर त्यांच्या कामाचा आवाका पाहता त्या त्यांच्या कारकीर्दीत देशाला एखाद्या वीरपुरुषाप्रमाणे पुढे नेण्यात सक्षम राहिल्या, असे म्हटले आहे. केवळ त्यांच्यातच भ्रष्ट व दुभंगलेल्या समाजाला आणि अध:पतनाकडे जाणा-या राजकीय व्यवस्थेला हाताळण्याचे सामर्थ्य होते, असेही नमूद केले आहे. म्हणून मोदी सरकारचा ‘संविधान हत्या दिवस’ हा भाजप, काँग्रेस आणि ‘इंडिया’आघाडीतील अन्य सदस्यांबरोबरच एनडीए आघाडीसमोर प्रश्न उपस्थित करणारा ठरू शकतो.

– रशिद किडवई, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, नवी दिल्ली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR