28.3 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeसोलापूरग्रामीण आरोग्य यंत्रणा रिक्त पदांमुळे सलाईनवर

ग्रामीण आरोग्य यंत्रणा रिक्त पदांमुळे सलाईनवर

सोलापूर : जिल्ह्यातील आरोग्य विभाग केवळ ८८० पदांवर सुरू असल्याची धक्कादायक स्थिती आहे. जिल्ह्यातील ७७ आरोग्य केंद्रे व ४३१ उपकेंद्रांसाठी १४३१ पदे मंजूर आहेत. पण, त्यातील तब्बल ५५१ पदे रिक्त असून आरोग्यसेविका व सेवकांची ४९५ पदे रिक्त आहेत. औषध वितरित करणाऱ्या औषध निर्माण अधिकाऱ्यांची २० पदे काही वर्षांपासून भरलीच नाहीत. ही वस्तुस्थिती खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याच जिल्ह्यातील आहे.

ग्रामीण आरोग्य यंत्रणा सांभाळणारा पहिला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्यसेविका व सेवक आहे. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये सद्य:स्थितीत तब्बल ४९५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका आरोग्य सेविकेकडे दोन-तीन आरोग्य उपकेंद्रांची जबाबदारी असल्याची वस्तुस्थिती आहे. गरोदर मातांचा सर्व्हे, लसीकरणावेळी सर्व्हे, साथरोग नियंत्रण सर्व्हे अशी कामे देखील त्यांना करावी लागतात.

रिक्त पदांमुळे कामात पारदर्शकता राहत नाही. अनेक आरोग्य उपकेंद्रांना रिक्त पदांमुळे टाळे लावण्यात आलेले आहे. केवळ लसीकरणावेळीच ती उपकेंद्रे उघडी असतात, असे चित्र आहे. औषध निर्माण अधिकाऱ्यांची जबाबदारी मोठी असते, पण ही पदे देखील रिक्त आहेत. दुसरीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांची १६१ पदे मंजूर आहेत, पण अनेक महिन्यांपासून १२ पदे रिक्त आहेत. वाढलेल्या रिक्त पदांमुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने त्यांचेच आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.
सोलापूरच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या जवळपास ३६ लाखांपर्यंत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दरवर्षी सुमारे २५ लाख रूग्ण वेगवेगळ्या आजारांवरील किमान प्राथमिक स्वरूपाचे उपचार तरी घेतात. रुग्णांसाठी आधार असलेली ही ग्रामीण आरोग्य यंत्रणा रिक्त पदांमुळे कोलमडली आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागासाठी १४३१ मंजूर पदे असतानाही त्यापैकी केवळ ८८० पदे भरली आहेत. उर्वरित पदे अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने सर्वसामान्य रुग्णांवर पदरमोड करण्याची वेळ येत असल्याची वस्तुस्थिती आहे.

शासनाने कर्मचारी भरतीची जाहिरात काढली असून त्यानुसार पदभरती होईल. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागाच्या ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये ५३१ पदे रिक्त आहेत.असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR