पंढरपूर : विशेष प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ‘घरातील सगळे वाद संपू दे,’ असे विठुरायाला साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील असे स्पष्ट संकेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. लोकसभा निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात लढल्या. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. राष्ट्रवादी मधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, आज उमपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपुरात विठ्ठालाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी विठुरायाला साकडे घातले.