पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात पाऊस कमी मात्र वीर व उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा (भीमा) नदीला पूर आला आहे. चंद्रभागा नदीवरील सर्व आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शेळवे ओढ्यात पाणी आल्यामुळे जुना अकलूज रस्ता व सर्व बंधाऱ्यांवरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे. तर चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. पंढरपूर शहरासह नदीकाठच्या गावांनी पुराची धास्ती घेतल्याचे चित्र आहे. प्रशासन अलर्ट मोडवर असून, आपत्कालीन व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरांसह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिला असून, काही मंदिरे पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. उजनी व वीर धरणांतून सोडलेले पाणी संगम येथे १ लाख २९ हजार क्युसेकने वाहत आहे. तर पंढरपूर येथे ८० हजार क्युसेकने पाणी वाहत आहे. मध्यरात्री पंढरपूर येथे सव्वालाखाचा विसर्ग येण्याची भीती आहे.या पाण्याने चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. तर जुना दगडी पूल व भीमा नदीवरील तालुक्यातील इतर ८ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर १ लाख ३० हजार क्युसेक पाणी आले तर पंढरपूर शहरातील नदीकाठची व्यास नारायण व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील घरात पुराचे पाणी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ४० हजार क्युसेकला पाण्याखाली जातात. त्यामुळे पंढरपूर येथील जुना दगडी पूल, गोपाळपूर, पटवर्धन कुरोली, पिराची कुरोली, गुरसाळे, कोठाळी, मुंढेवाडी, पुळूज येथील बंधारे पूल पाण्याखाली गेली आहेत. येथील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. येथे पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे खबरदारी म्हणून नगरपालिका प्रशासनाकडून ३० पेक्षा जास्त नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर १५ कुटुंबाचे स्थलांतर करून त्यांना उपजिल्हा रुग्णालयासमोरील रायगड भवन येथे राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली.वीरमधून सुरू असलेला विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला असला तरी उद्या पंढरपुरात १ लाख २० हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी येऊ शकते. त्यामुळे झोपडपट्टीत पाणी शिरण्याची शक्यता आहे. पंढरपूर तालुक्यातील पूर स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तरी नागरिकांना परिस्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आले आहे असे पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगीतले.