चाकुर : प्रतिनिधी
तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीमध्ये थकीत असलेली पाणीपट्टी व घरपट्टीच्या वसुलीसाठी राबवण्यात आलेल्या मिशन स्वाभिमान मोहिमेअंतर्गत एका दिवसात २१ लाखांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. त्यामुळे चाकूर तालुका जिल्ह्यात प्रथम आला आहे. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांचा प्रशस्तीपत्रक पत्र देऊन सन्मानित केले.
गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी पंचायत समिती गण निहाय दहा पथकाची विशेष नियुक्ती केली. व बैठक घेऊन कर वसुलीचे नियोजन केले. त्यानुसार २९ नोव्हेंबर रोजी २० लाख ९३ हजार ६७ रुपयांची करवसुली झाली आहे. यात नळेगाव, सुगाव, आटोळा, जानवळ, आष्टा, नांदगाव, देवंग्रा, अजन्सोंडा (बु), डोंग्रज, रायवाडी, नागेशवाडी या अकरा ग्रामपंचायतीमध्ये एक लाख रुपयांपेक्षा अधिक वसुली झाली आहे. विक्रमी वसुली मिशन स्वाभिमान मोहिमेअंतर्गत अनेक वर्षापासून थकीत असलेली पाणीपट्टी व घरपट्टी वसुली केली. यामध्ये ग्रामस्थांकडून सहकार्य मिळाले असल्यामुळे विक्रमी वसुली झाली. सदरील मोहीम प्रत्येक महिन्याला राबवली जाणार आहे. यास ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी केले आहे.