22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमुख्य बातम्याचीनी ड्रॅगनची आता ‘पीओके’वर नजर!

चीनी ड्रॅगनची आता ‘पीओके’वर नजर!

१३ हजार फूट उंचीवर बनवला लष्करी तळ; ताजिकिस्तानात टेरर बेस, मध्य आशियावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चीनी ड्रॅगनच्या कुरापती काही केल्या थांबत नाहीत. पूर्व लडाखनंतर त्यांची नजर आता पाकव्याप्त काश्मीरवर आहे. अलिकडेच चीनने ताजिकिस्तानमध्ये ४ हजार फूट उंचीवर लष्करी तळ बांधला असल्याचे नुकतेच सांगण्यात आले. हे काम अनेक दशकांपासून सुरू होते, हे ठिकाण ‘पीओके’ पासून फार दूर नाही. तेथे गुप्त लष्करी तळ उभारून दारूगोळा जमा करणे हा चीनच्या या कारवाईमागील उद्देश आहे, असे म्हटले जात आहे.

मॅक्सर टेक्नॉलॉजीजने सॅटेलाइटमधून घेतलेली काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांवरून चीन गुप्त लष्करी तळ उभारत असल्याचा दावा करण्यात आला. लष्करी तळाच्या भिंती आणि प्रवेशाचे रस्ते, वॉच टॉवर, हेलिपॅड चित्रांमध्ये दिसत आहेत. चिनी लष्करी तळावर निरीक्षणाचे टॉवर्स आणि चिनी सैनिकही तैनात आहेत. सूत्रांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील तालिबानच्या माघारीनंतर कथित दहशतवादविरोधी तळ बांधण्यात आला होता आणि त्यासाठीचा करार २०२१ मध्ये झाला.

रशिया आणि भारत या दोन्ही देशांचा ताजिकिस्तानमध्ये मोठा वाटा आहे. भारत ताजिकिस्तानमधील आयनी एअर बेस चालवतो. तेथे सुखोई देखील तैनात करण्यात आले होते. मात्र नंतर ही सुविधा बंद करण्यात आली.

२००२ ते २०१० दरम्यान भारताने हवाई तळाचे नूतनीकरण करण्यासाठी, धावपट्टीचा ३२०० मीटरने विस्तार करण्यासाठी आणि अत्याधुनिक नेव्हिगेशनल आणि हवाई संरक्षण उपकरणे स्थापित करण्यासाठी ७० दशलक्ष डॉलर्स खर्च केले. तथापि, आता या लष्करी तळाच्या माध्यमातून मध्य आशियात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न चीन करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ताजिकिस्तानमध्ये उभारण्यात येत असलेल्या लष्करी तळाला ‘काउंटर टेरर बेस’ असे नाव देण्यात आले आहे. चीनची ही कृती रशिया, भारतासाठी चिंतेचे कारण ठरणार आहे. चीन ज्या ठिकाणी आपला लष्करी तळ बनवत आहे ती जागा अफगाणिस्तान सीमेजवळ असल्यामुळे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

चीनकडून इन्कार : चीनने मात्र हे वृत्त निराधार म्हणत फेटाळून लावले आहे. पण फोटो मात्र खरे असल्याचे म्हटले जात आहे. ताजिकिस्तानमध्ये कोणताही गुप्त लष्करी तळ बांधला जात नसल्याचे चीन म्हणत आहे. चिनी दूतावासाने हा अहवाल खोटा ठरवला असून हा मुद्दा चीन-ताजिकिस्तान चर्चेच्या अजेंड्यावर नसल्याचे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR