माले : मालदीवचे विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे भारतविरोधी आहेतच. पण सातत्याने ते आपल्या कृतीमधून भारताला डिवचण्याचे काम करत आहेत. भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद मुइज्जू आता उघडपणे भारतविरोधी भूमिका घेत आहेत. त्यांच्या या भूमिकांना मालदीवमधल्या अन्य राजकीय नेत्यांचा विरोध आहे. मात्र, तरीही त्यांनी भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे चीनच्या जवळ जात असतानाच आता त्यांनी पाकिस्तानला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. भारताचे पाकिस्तान बरोबर कसे संबंध आहेत? हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. पाकिस्तानची स्वत:ची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना आता पाकिस्तान मालदीवच्या विकासात मदत करणार आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवारुल हक काकड यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक सुदृढ करण्याच त्यांनी ठरवले.
पाकिस्तानने मालदीवला विकासात मदत करण्याचे आश्वासन दिले. मुइज्जू सरकारने तात्काळ विकास योजनांवर पाकिस्तानकडून समर्थन मागितले. भारत आणि मालदीवमधील संबंध ताणलेले असताना मालदीव-पाकिस्तानच्या जवळ येणे ही साधीसुधी गोष्ट नाही. भारताबरोबर वाद झाल्यानंतर मालदीवने चीन बरोबर संबंध सुधारले. आता ते पाकिस्तानच्या जवळ जात आहेत. पाकिस्तान आणि मालदीवमध्ये २६ जुलै १९६६ रोजी राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दोन्ही देशांचे चीन बरोबर चांगले संबंध आहेत. पाकिस्तान चीनचा जवळचा सहकारी आहे. मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मुइज्जू बिजींग समर्थक आहेत.