पूर्णा : एका महिला खातेदाराने बँकेतून काढून पिशवीत ठेवलेले ३० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना दि. २ रोजी शहरातील महावीर नगरमधील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत घडली. हा घटनाक्रम बँकेच्या सिसिटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पूर्णा तालुक्यातील सुकी येथील रहिवासी असलेल्या शोभा राजू रणवीर (३४) या सोमवारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत गेल्या होत्या. आपल्या खात्यातून ३० हजार रुपये काढून त्यांनी ते पैसे आपल्याजवळील पिशवीत ठेवले. यावेळी एका चोरट्याने पिशवी कापून हे पैसे हातोहात लांबविले. ही बाब निदर्शनास येताच त्यांनी हा घडलेला प्रकार बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी यांना सांगितला.
त्यानंतर त्यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असता एका चोरट्याने महिलेची पिशवी कापून पैसे हातोहात लांबविल्याचे दिसून आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करा आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलिस हेड काँस्टेबल नळगीरकर करत आहेत.
बँक प्रशासनाचा निष्काळजीपणा
बॅकेत सुरक्षा रक्षक तैनात नसतो, बॅकेत नेहमीच गर्दी होत असते. त्यामुळे या गर्दीत चोरटे आपला हात मारुन घेतात. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. पण बँक प्रशासन सुरक्षेबाबत कोणतीच काळजी घेताना दिसत नाही. घटना घडून गेल्यावर मात्र थातूरमातूर उपाययोजना केल्या जातात असे सर्व सामान्य नागरिकांत चर्चा आहे. पोलिस प्रशासन व बँक प्रशासनांने या घटनेला गाभीर्याने घेतले पाहिजे अशी मागणी नागरीकातून होत आहे.