अकोट न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
अकोला : प्रतिनिधी
अकोल्यातील बहुचर्चित च-हाटे कुटुंबीयांतील ४ सदस्यांच्या हत्याकांडात आज एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट न्यायालयाने आज हा महत्वपूर्ण निकाल दिला. अडीच एकर शेतीच्या वादातून बहिणीने पतीच्या आणि पोटच्या दोन मुलाच्या मदतीने सख्या दोघा भावांसह त्यांच्या २ मुलांना असे एकत्रित चौघांना संपवले होते. २८ जून २०१५ ची घटना असून तब्बल ९ वर्षांनंतर न्यायालयाने आज हा निर्णय दिला.
दरम्यान, या प्रकरणात हरिभाऊ राजाराम तेलगोटे, द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे आणि मुलगा कुंदन हरिभाऊ तेलगोटे या तिघांना न्यायालयाने दोषी ठरवत मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात आणखी एक मारेकरी मुलाचा समावेश असून तो अल्पवयीन आहे. सध्या बाल न्यायालय मंडळात त्यांचे प्रकरण सुरू आहे.
या प्रकरणात बाबूराव सुखदेव च-हाटे (६०, नोकरी, शिक्षक) आणि धनराज सुखदेव च-हाटे (५०), गौरव धनराज च-हाटे (१९), शुभम धनराज च-हाटे (१७) अशी मृतांची नावे आहेत. मृत धनराज आणि बाबूराव यांची सख्खी बहीण द्वारकाबाई आणि पती हरिभाऊ आणि पोटच्या २ मुलांच्या मदतीने शेतीच्या वादातून २८ जून २०१५ रोजी धारदार शस्त्रांनी निर्घृण खून केला होता. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ग्राम मालपुरा गावात शेतीच्या जमिनीवरून हे हत्याकांड घडले होते.