सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर ‘वाईटातून चांगले घडते’, असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. आता दीपक केसरकर यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे त्यांनी म्हटले आहे.
दीपक केसरकर म्हणाले, मी बोललो होतो की, आम्हाला अतिशय दु:ख आहे. झालेला प्रसंग अतिशय दुर्दैवी आहे. परंतु हे वाईट घडून गेले आहे. या वाईटामधून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावे, एवढीच आम्ही प्रार्थना करतो. हे करत असताना जयंत पाटील आले आणि माझ्यावर टीका करून गेले. त्यांनी काही केलं का? आम्ही ९ एकर जमीन शोधून काढली. त्याच्यावर आरक्षण आहे. त्या नऊ एकर जमिनीवर शिवसृष्टीची उभारणी होऊ शकते. १२ मीटरचे रस्ते कुठून कुठे जातात हे शोधून काढले. हा प्रस्ताव येथे दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
मी काय चुकीचं बोललो हे सांगा
ते पुढे म्हणाले की, तिथे अतिशय भव्य पुतळा उभारण्यासंदर्भात भारतातील ज्येष्ठ मर्तिकारांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. हे जे घडले ते १०० टक्के वाईट घडले आहे. यात मी काय चुकीचे बोललो हे सांगा. याचा चुकीचा अर्थ काढण्याचे कारण काय? पुतळा पडला हे चांगले असे मी कधी म्हटले का? पुतळा पडणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामधील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. आज सुद्धा नेव्हीची टीम पुतळा कशामुळे पडला? हे शोधून काढत आहे. दोषींना शिक्षा होईल. मी काय त्यांचे समर्थन केलेले आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.