पुणे : प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराज यांचे अलौकिक विचार हे जगाला दिशादर्शक व प्रेरणादायी आहेत असे मत सुप्रसिध्द साहित्यिक शरद गोरे यांनी व्यक्त केले ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १६ व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. मौलाना अबुल कलाम सभागृह कोरेगाव पार्क, पुणे येथे हे संमेलन संपन्न झाले.
बहूभाषा पंडित असणारे जागतिक कीर्तीचे विचारवंत साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज जगापुढे येणे गरजेचे आहे,संभाजीराजेंचे साहित्य हे मानवी मूल्यांवर भाष्य करणारे आहे,समता, समानता हि त्यांच्या विचारांच्या क्रेंद्रस्थानी असल्याने त्यात विश्व कल्याणाचा सार दडला आहे. त्याचा जागतिक पातळीवर प्रचार झाला पाहिजे त्यासाठी राज्य सरकाराने पुढाकार घेतला पाहिजे.
बुधभूषण, नायिकाभेद, सातशतक, निखशिख, या संभाजीराजेंनी लिहिलेले ग्रंथ सर्व भाषेत पोहचले पाहिजेत, सर्व विद्यापीठात त्यांच्या साहित्याचा तौलिक व मौलिक अभ्यास होण्यासाठी अध्यासनं निर्माण झाली पाहिजेत व मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिले पाहिजे तसेच केंद्र सरकारच्या महापुरूषांच्या यादीत संभाजीराजेंचा समावेश करावा अशी मागणी उद्घाटन पर भाषणात गोरे यांनी केली.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामुगडे,साहित्य परिषदेचे राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक, प्रदेश संघटक अमोल कुंभार, पुणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर धायरीकर,जयश्री नांदे, सिंघुताई साळेकर,बाळकृष्ण अमृतकर,विनोद अष्टुळ,नाना माळी, रमेश रेडेकर, प्रतिभा मगर, निखील घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते, या प्रसंगी वसंतराव पाटील यांना जीवनगौरव अनिल सांगळे ( समाजरत्न) हनुमंत चिकणे ( कृषीरत्न ) राजन जांबळे ( पर्यावरणरत्न ) लविना चांदेकर ( शिक्षकरत्न ) यांनी छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या साहित्य संमेलनात राज्यभरातील १३२ साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदवला होता.