24.8 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगरात उद्धव ठाकरेंना धक्का

छ. संभाजीनगरात उद्धव ठाकरेंना धक्का

शहरप्रमुखासह पदाधिका-यांचे राजीनामे

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, आज शहरप्रमुख विश्­वनाथ स्वामी यांच्यासह ३५ जणांनी प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले. त्यात प्रमुख पदाधिका-यांसह माजी नगरसेवकांचा समावेश आहे. हे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते.

शिवसेना ठाकरे गटाला नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून गळती लागली आहे. पक्षाचे अनेक पदाधिकारी, माजी महापौर, माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मराठवाडा विभागाचे सचिव अशोक पटवर्धन यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यापूर्वी माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले यांनी त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गटबाजीला वैतागलेल्या पदाधिका-यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी नुकताच मेळावाही घेण्यात आला. यावेळी यापुढे कोणीही शिवसेना सोडणार नाही, असा दावा करण्यात आला. पण आठच दिवसांत हा दावा फोल ठरला आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून उद्धवसेना कुमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता भाजपनेही जाळे टाकायला सुरुवात केली आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या पूर्व मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख विश्­वनाथ स्वामी यांच्यासह ३५ जणांनी प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR