परभणी : येथील जिल्हा स्त्री रूग्णालयातून जन्म प्रमाणपत्र घेताना बाळाचे, आई, वडीलांचे नावांत दुरूस्ती असल्यास ५०० रूपयांच्या बॉन्ड पेपरवर लिहून द्यावे लागत आहे. त्याऐवजी को-या कागदावर शपथपत्र घेवून त्यावर कोर्ट स्टॅम्प तिकीट लावून सदरील प्रमाण पत्र देण्यात यावे. यासाठी जिल्हा स्त्री रूग्णालय अधीक्षक व कर्मचारी यांना आदेशीत करावे अशी मागणी झरी येथील उपसरपंच राइन डी.के. इनामदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, परभणी येथील जिल्हा स्त्री रूग्णालयात ज्या बाळांचा जन्म होतो त्यांना येथून जन्म प्रमाणपत्र देण्यात येते. परंतू बाळाचे जन्म प्रमाणपत्र घेताना बाळाचे, आई, वडीलांचे नावांमध्ये दुरूस्ती असल्यास त्यासाठी ५०० रूपयांच्या बॉन्ड पेपरवर लिहून द्यावे लागत आहे. याबाबत जिल्हा स्त्री रूग्णालयातील कर्मचा-यांना विचारणा केली असता वरीष्ठांचे आदेश असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी १०० रूपयांचे बॉन्ड पेपर चलनात होते. त्यामुळे नागरीकांना त्यावर लिहून देण्यास अडचण येत नव्हती. परंतू १०० रूपयांचे बॉन्ड पेपर बंद झाल्याने आता ५०० रूपयांचे बॉन्ड पेपरवर लिहून द्यावे लागत आहे. त्यामुळे गोरगरीब नागरीकांना ५०० रूपयांचा आर्थिक भुर्दंड न परवडणारा असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
एकीकडे शासन महिलांसाठी सर्व आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देत आहे. दुसरीकडे बाळाच्या जन्म प्रमाणपत्रासाठी आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे ५०० रूपयांच्या बॉन्डऐवजी को-या कागदावर कोटॅ स्टॅम्प लावन शपथपत्र घेण्याचे आदेश जिल्हा स्त्री रूग्णालयातील अधीक्षक व कर्मचा-यांना यांना देण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर झरी येथील उपसरपंच राइन डी.के. इनामदार यांची स्वाक्षरी आहे.