छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तेव्हा मी मनोज जरांगे पाटील यांचे नावही घेतले नव्हते. मात्र मुद्दाम माझ्याकडे काही माणसे पाठवून घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी करणा-या या लोकांचे शरद पवार यांच्यासोबत फोटो आहेत. काल बीडमध्ये घडलेल्या प्रकारात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच सहभागी होता.
जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे विधानसभेत मते मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत. मात्र तुम्हाला जे करायचं ते करा, पण माझ्या नादी लागू नका. नाहीतर माझी पोरं काय करतील हे तुम्हाला समजणारही नाही, असा आक्रमक इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. ते छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
या राजकीय नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, माझे मोहोळ उठलं तर यांना निवडणुकांमध्ये सभाही घेता येणार नाहीत. कारण त्यांच्याकडे प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत, असा घणाघात राज ठाकरेंनी केला आहे.
मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकारणावर हल्लाबोल करताना राज ठाकरे पुढे म्हणाले की, तुमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग असेल तर तुम्ही त्यांच्यावर टीका करा. पण त्यासाठी समाजात कशाला भांडणे लावत आहात? शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचा मणिपूर होईल, असे म्हणतो. याचा अर्थ मतांसाठी या लोकांकडून जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
मराठवाड्यात जे जातीचे राजकारण सुरू आहे त्यामध्ये काही पत्रकारांचाही समावेश आहे. धाराशिवमध्ये जेव्हा माझ्याकडे येऊन काही लोकांनी घोषणा दिल्या तेव्हा त्यांना उकसवणारे काही पत्रकारच होते. कोणत्या पत्रकाराला कुठे कंत्राट मिळाले आहे, कोणाला एमआयडीसीची जागा मिळाली आहे, ही सगळी माहिती माझ्याकडे आली आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.