जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात सर्वाधिक मजुरांची संख्या आहे. एकदा का खरीप हंगाम संपला की तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम राहत नाही त्यामुळे तालुक्यातील मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागते. अशातच साखर कारखान्याचा गळीत हंगाम यावर्षी लवकर सुरू होत असल्यामुळे तालुक्यातील ऊसतोड कामगार साखर कारखान्याकडे रवाना झाले आहेत.
या वर्षीही ऊसाचे कारखाने दिवाळी झाल्यावर सुरू होत आहेत. यावर्षी म्हणावा तेवढा ऊस नाही, यामुळे हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे. जळकोट तालुक्यात हजारोच्या संख्येने ऊसतोड कामगार आहेत. जळकोट तालुक्यात वाडी तांड्याची संख्या जास्त आहे येथे मोठ्या प्रमाणात ऊस तोड मजूर आहेत. एकदा का ऊस कारखाने सुरू झाले की जळकोट तालुक्यातील वाडी तांडे ओस पडू लागतात.
यावर्षीही दिवाळीपूर्वीच जळकोट तालुक्यातील वाडी तांडे ओस पडू लागली आहे. जळकोट तालुक्यातील रामपूर तांडा, अग्रवाल तांडा, रावणकोळा तांडा, जळकोट तांडा, शिवाजीनगर तांडा, थावरु तांडा, मेघातांडा, धोंडवाडी, गुत्ती, धनगरवाडी, शिवाजीनगर, रावणकोळा, तिरुका, अतनूर,चिंंचोली आदी गावासह अनेक गावांमधून मजुरांचे कामासाठी स्थलांतर होत असते. जळकोट तालुक्यात यावर्षी मुसळधार पाऊस झाल्यामुळे जवळपास ८० टक्के खरीप हंगाम वाया गेला आहे. यामुळे गावातील मजुरांच्या हाताला सध्या काम नाही. यामुळे तालुक्यातील मजुरांना ऊस तोडीसाठी कारखान्याकडे मार्गस्थ व्हावे लागत आहे.