जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुका तसेच परिसरामध्ये चा-याची टंचाई निर्माण झाली आहे . शेतकरी आपल्या शेतात खरीप हंगामामध्ये ज्वारीची पेरणी अतिशय कमी प्रमाणात करीत आहे. यामुळे शेतक-याजवळ कडबा उपलब्ध कमी होत आहे. या कारणाने चा-याची टंचाई निर्माण झाली आहे.
आता शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीची पेरणी केली होती . याची काढणी झाली असून आता शेतकरी हा कडबा घेऊन चा-याची जमवा- जमव करीत आहेत. कडब्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. कडव्याची एक पेंडी पंधरा रुपयाला झाली आहे. जळकोट परिसरातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात ज्वारीची पेरणी करीत असे. यामुळे मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत असे व जनावरांच्या चा-याचा प्रश्न मिटत असे परंतु गत अनेक वर्षापासून शेतक-यांंनी ज्वारीचा पेरा कमी केला आहे. सोयाबीन तसेच इतर नगदी पिकाकडे शेतक-यांंचा कल वाढला आहे यामुळे ज्वारीच्या कडबा कमी झाला आहे . यासोबतच शेतीचे क्षेत्र अधिक करण्यासाठी बांध देखील कमी केले जात आहेत, यामुळे गवत देखील कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. यासोबतच शेतीमध्ये तृणनाशक फवारल्यामुळे , शेतातील इतर चारा वर्गीय गवताचे प्रमाण कमी होत आहे . यामुळेच चा-याचा प्रश्न निर्माण झाला आहे .
गत चार वर्षापासून शेतक-यांंनी आपल्या शेतात रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी सुरू केली आहे. ज्यांच्याकडे जास्त जनावरे आहेत असे शेतकरी हा कडबा घेताना दिसून येत आहेत. कडव्याच्या किमतीही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येत आहेत. पूर्वी पाचशे रुपयांना शंभर कडबा मिळायचा आता शंभर कडब्याचीकिंमत पंधराशे रुपयांच्या वर झाली आहे. सर्वसामान्य शेतक-यांना एवढ्या महागाचा कडबा घेणे शक्य नाही परंतु आपल्या जनावरांना जगवण्यासाठी हा महागाचा कडबा घेणे गरजेचे बनलेले आहे.