जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुका तसेच परिसरातील शेतकरी सध्या वन्यजीव प्राण्यांच्या त्रासाला वैतागले आहेत . विशेष म्हणजे रानडुकराने शेतक-यांना सळो की पळो करून सोडले आहे. या रानडुकरांच्या भीतीमुळे अनेक शेतक-यांनी शेतामध्ये रब्बी पिकांची पेरणी करणे टाळले आहे. जळकोट तालुक्यामध्ये रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक गावामध्येकिंवा गावाच्या शिवारात १०० ते २०० रानडुकरांचा कळप आहे. संपूर्ण तालुक्यात रानडुकरांची संख्या पाच हजाराच्या वर असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या रानडुकरामुळे शेतामधील पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतामधील ऊस रानडुकरे आडवा करीत आहेत. ज्या शेतक-यांनी शेतामध्ये हरभराकिंवा गहू तसेच इतर कुठलीही रब्बीची पिके पेरली तर यामध्ये रानडुकरे प्रवेश करून प्रचंड रब्बी पिकांचे नुकसान करीत आहेत विशेष म्हणजे रानडुकरांचे कळप असल्यामुळे या रानडुकरांना एकट्याने परतवून लावण्याची ंिहमत होत नाही केवळ वन्यजीव प्राण्याला कंटाळून अनेक शेतक-यांनी रब्बी पिकांची पेरणी करणे टाळले आहे.
रानडुकरांसोबतच जळकोट तालुक्यामध्ये वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, शेकडोंच्या संख्येने ही वाणरे शेतीमध्ये फिरत आहेत. कापसाची बोंडेही हे वानरे खाऊन टाकत आहेत. यासोबत हरिनांची संख्याही खूप वाढली आहे. ज्या पिकांनी जमिनीच्या वर माना काढल्या आहेत. अशा पिकांचे शेंडेही हरणे खाऊन टाकत आहेत. यामुळे पिकांची वाढ होत नाही. या वन्यजीव प्राण्यांना शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. येणा-या काळात अशीच स्थिती राहिली तर शेतक-याांंना शेती करणे अवघड होऊन बसणार आहे यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन रानडुकरासारख्या प्राण्यांचा बंदोबस्त करावा तसेच त्यांना पकडून जंगलामध्ये सोडून द्यावे, अशी मागणी जळकोट तालुक्यातील शेतक-यांनी केली आहे.