जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात दि २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजल्या पासून ते रात्री ८ पर्यंत तुफान पाऊस पडला. यामुळे जळकोट तालुक्यातील डोंगरगाव परिसरात मोठे नुकसान झाले आहे . तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. जळकोट व घोणशी मंडळामध्ये मिळून ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकट्या जळकोट मंडळात आत्तापर्यंत तब्बल ७९३ मिलीमीटर इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत हा सर्वाधिक पाऊस आहे.
जळकोट मंडळात आजपर्यंत तीन ते चार वेळेस अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे नदीकाठच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे शुक्रवारी ढगफुटी झाली होती. यामुळे मातीसह पिके वाहून गेली होती. आता दि २१ रोजी डोंगरगाव परिसरात ढगफुटी झाली आहे. यामुळे डोंगरगाव परिसरातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.
नदीकाठची पिके वाहून गेली आहेत. अनेकांची शेती जमिनीची माती वाहून गेली आहे. रस्ते खचले आहेत तर जळकोट शहरात दि २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे जळकोट जवळून वाहणा-या नदीला पूर आला होता. यामुळे जळकोट ते दापका तसेच जळकोट ते रावण कोळा हा मार्ग तब्बल ७ ते ८ तास बंद होता. याच पावसामुळे हळद वाढवणा रोडवरील नदीमध्ये दुखसकी वाहून आली दिसून आली. याची माहिती जळकोट येथील नागरिक मारुती मोहटे यांनी दिली. दोन दिवसापूर्वी म्हणजे सोमवारी जळकोट शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला होता. यावेळीही जळकोट ते रावणकोळा मार्गावरील संपर्क तुटला होता.