22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरजळकोट येथे पशु चिकित्सालयाच्या नवीन इमारतीची मागणी  

जळकोट येथे पशु चिकित्सालयाच्या नवीन इमारतीची मागणी  

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट येथे श्रेणी १ चा  पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र या दवाखान्यामध्ये अतिशय अपुरी जागा असल्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना तालुक्यातील शेतक-यांना करावा लागत आहे . तसेच जळकोट येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत ही अतिशय जुनी झाली आहे. यामुळे आता तालुक्याला साजेशी जळकोट शहरांमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत व्हावी अशी मागणी तालुक्यातील शेतक-याकडून केली जात आहे.
जळकोट तालुक्यामध्ये सध्या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालय तसेच शासकीय निवासस्थानाच्या इमारती उभ्या केल्या जात आहेत. यामध्ये प्रशासकीय इमारत, बस स्थानकाची इमारत, विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयासाठी नूतन इमारत, पंचायत समितीच्या कर्मचा-यांसाठी निवासस्थान, यासोबतच विविध सभागृहाचे काम देखील जळकोट शहरांमध्ये सुरू आहे.
जळकोट शहरांमध्ये अनेक सरकारी इमारती उभा टाकल्या जात असल्या तरी शेतक-यांच्या दृष्टीने पशुवैद्यकीय दवाखाना अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. शेतक-यांचे पशु आजारी पडले असता त्यांना चांगले उपचार मिळणे देखील तालुक्याच्या ठिकाणी आवश्यक असते. जळकोट सारख्या ठिकाणी फक्त प्राथमिक उपचाराची सोय आहे तसेच या ठिकाणी अतिशय जुन्या असलेल्या इमारतीमध्येच पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार सुरू आहे. यामुळे अनंत अडचणीचा सामना जळकोट तालुक्यातील शेतक-यांना करावा लागत आहे. जळकोट तालुक्यातील शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात परिणामी शेतक-यांचा जनावरांना चांगला उपचार देखील मिळणे गरजेचे असते. जळकोट मध्ये चांगला दवाखाना उभा राहावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या मंडळीचे दुर्लक्ष झालेले आहे .
  जळकोट येथे तालुका लघु पशु चिकित्सालय निर्माण करणे गरजेचे होते. हे चिकित्सालय जळकोटला झाले असते तर या दवाखान्यामध्ये क्ष-किरण व्यवस्था, सोनोग्राफी व्यवस्था, ऑपरेशन थिएटर, आधुनिक उपचार पद्धती या ठिकाणी उपलब्ध झाल्या असत्या परंतु आजपर्यंत या सर्व बाबीकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. यामुळे जळकोट तालुक्यातील पशुपालक शेतक-यांना त्यांच्या जनावराला एखादी गंभीर आजार झाल्यास उदगीरला जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. जळकोट येथे सर्व सोयीयुक्त तालुका पशु चिकित्सालय मंजूर करावे तसेच जळकोट या ठिकाणी सर्व सोयीयुक्त नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून इमारत उभी करावी अशी मागणी  जळकोट तालुक्यातील शेकडो पशुपालक शेतक-यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR