लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयद्वारा आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ ची प्राथमिक फेरीत लातूर केंद्रावर येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृति सभागृहात दि. ११ डिसेेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कलोपासक मंडळ लातूरच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखीत व श्रुतिकांत ठाकुर दिग्दर्शित ‘संगीत दहन आख्यान’ हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले.
माणसांचे जीवन स्वप्नांच्या जहाजात हेलकावे खात असतात. कधी प्रश्नांची, अडचणींची लाट इतकी प्रचंड उसळते की, त्यात स्वप्नांचे जहाज बुडण्याची भिती असते नव्हे अनेकांचे जहाज बुडतातही. असेच स्वप्नांची आस घेऊन गाव सोडून शहराकडे गेलेल्या एक गरीब कुटूंबाला वास्तवाचे चटके स्वीकारावे लागतात. हे सांगत असतानाच दुरुन सुंदर दिसणारे पण फसवे वास्तव अनेक विषयाने त्यांच्या जगण्याला गुरफटून टाकतात. त्यात होणारी त्या जोडप्याची दमछाक एका वेगळ्या पद्धतीने हे नाटक मांडते, असे असले तरी ‘संगीत दहन आख्यानाचे जळजळीत सत्य मनाला भिडते. धनंजय सरदेशपांडे यांच्या दमदार लेखन शैलीतून उतरलेले हे नाटक कलोपासक मंडळ लातूरच्या टिमने अतिश्य कष्टाने उभे केले, हे विशेष.
पडदा उघडतो आणि कीर्तन सुरु असते. कीर्तनकार हरिष कुलकर्णी व भाविक-भक्त विठ्ठलाच्या चरणी लीन होतात. तितक्यात काही तरी विपरीत घडते आणि उत्तम (दस्तगीर शेख) धावतपळचत कीर्तनाच्या ठिकाणी येतो. माझी सुंदरा कुठे आहे, असे विचारत सुंदराचा शोध सुरु होतो. या प्रसंगाने टाळ्या घेतल्या. यात दिग्दर्शक श्रुतिकांत ठाकूर यांनी वापरलेली कल्पकता दिसून आली. पुजा कुलकणी (सुंदरा), आशुतोष खरवळे (निवेदक), शरद कुलकर्णी (धनीलाल), रागिणी कुलकर्णी (ताई), श्वेता देसाई (नर्स), सिद्धार्थ कांबळे (पोलीस), महेश दास्ताने (साहेब), शैलजा शर्मा (विमल), दत्ता भंडारे (शिपाई), सुनिता कुलकर्णी-देशमुख (सरु अक्का), शिवहार आकुसकर (पोलीस हवालदार) या सर्वांच्या सामुहिक अभिनयाने ‘संगीत दहन आख्यान’ या नाटकाला एका उंचीवर नेले.
अॅड. स्मिता परचुरे, अॅड. अभिमन्यू नेत्रगावकर आणि प्रा. विभाकर मिरजकर यांची निर्मिती असलेल्या ‘संगीत दहन आख्यान’ या नाटकाचे नेपथ्य सुनील निलंगेकर यांनी केले. नाटकाला सुसंगत नेपथ्य होते. अनिल राजहंस यांची प्रकाश योजना ब-यापैकी होती. संगीत संकलन कौस्तूभ जोशी यांचे होते. त्यांना विजय जाधव यांनी साथ दिली. सहायक गायक म्हणून शैलजा शर्मा व दस्तगीर शेख यांनी सुरेख साथ दिली. भारत थोरात यांनी पुन्हा एकदा रंगभूषेत आपले नैपुण्य सिद्ध केले. रागिणी कुलकणी, संतोषी कहाळेकर यांची वेषभूषा उत्तम होती.