लातूर : योगीराज पिसाळ
जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणा-या १४ विद्यार्थ्यांना इम्फेटिव्ह हिपाटाईटीस या काविळ आजाराची लागण झाली आहे. सदर विद्यार्थ्यांची गंगापूरच्या आरोग्य विभागाच्या टिमने तपासणी सुरू केली आहे. बुधवारी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषध-गोळया देण्यात आल्या आहेत. सदर आजार हा पिण्याच्या पाण्यामुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालयात नियमित होणारा पाणी पुरवठा बंद करून दुसरे पाणी विद्यार्थ्यांना देण्याच्या सुचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.
लातूर शहरापासून जवळच असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची खाण तयार होते. जिल्हयातील प्रत्येक पालकांना या शाळेत आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा असते. मात्र या ठिकाणी मोजक्याच गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळते. १९८६ पासून सुरू असलेल्या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्र व देशातील विविध महत्वाच्या पदावर कार्यरत असल्याची ख्याती आहे. या ठिकाणी शिक्षणासाठी दाखल होणारा विद्यार्थी आपल्या परिवारापासून कोसो किलोमिटर दूर वरून आलेला असतो. त्याच्या राहण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची, शिक्षणाची सोय ही सदर विद्यालयाकडेच असते. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
जवाहर नवोदय विद्यालयात कांही विद्यार्थ्यांना काविळ झाल्याचे आरोग्य विभागाला समजताच लातूर तालुका आरोग्य विभागाने गंगापूर प्राथमिक आरोग्य विभागाच्या दोन टिम कार्यान्वीत केल्या असून त्यांनी बुधवारी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून ८१ रक्तांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना औषध-गोळयाही दिल्या आहेत. तपासणी दरम्यान कांही मुलांचे डोळे पिवळे दिसून आले. त्यांना इम्फेटिव्ह हिपाटाईटीस या काविळ आजाराची लागण झाली आहे.