निटूर : वार्ताहर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दोन वर्षापूर्वी लोकार्पण झालेला जहिराबाद-लातूर महामार्गावर निलंग्यापासून लातूरपर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. दुचाकीचे टायर या भगदाडात जाण्यासारखे मोठे भगदाड या रस्त्यावर पडले असून अनेक ठिकाणी चिरा पडल्या आहेत मात्र याकडे संबंधित कुठलीच यंत्रणा लक्ष देत नाही यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होऊन गंभीर आपघात होऊन हात, पाय फ्रॅक्चर होणे असे प्रकार वाढले आहेत.
दोन तीन वर्षापूर्वी अनेक अडथळ्याची शर्यत पार करून ७५२ नंबरचा जहिराबाद-लातूर हा राष्ट्रीय महामार्ग तयार झाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण झाले. जहिराबादहून निघालेला हा महामार्ग निलंगा तालूक्यातून औराद शहा, निलंगा, निटूरमार्गे तो लातूर गेला मात्र काम होऊन दोनच वर्षे झाली. परंतु हा रस्ता अनेक ठिकाणी चिरला असून भल्या मोठ्या भेगा या महामार्गाला पडल्या आहेत. दुचाकीचे अख्खे टायरच यात अडकत आहेत. त्यामुळे अपघात होत असून अनेक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले आहेत. निलंगा तालुक्यातून ६५ किलोमीटरचा हा महामार्ग आहे. त्यासाठी जवळपास तीनशे कोटींचा निधी वापरला गेला मात्र दोनच वर्षात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील भेगामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.