आज जग अस्वस्थ आहे. अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाच्या ठिणग्या उडत आहेत. दोन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आता शिगेला पोहोचले आहे. हे युद्ध शमावे म्हणून भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच युक्रेनला भेट दिली; परंतु युद्धाची तीव्रता कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. २०२२ पासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षाने अत्यंत उग्र स्वरूप धारण केले आहे. युक्रेनने थेट रशियातील मोठ्या भूप्रदेशावर आक्रमण करून रशियाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर रशियाने क्षेपणास्त्राद्वारे युक्रेनला जोरदार प्रत्युत्तर दिले.
युक्रेन जर आटोक्यात आला नाही तर रशिया त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्रांचा शेवटचा पर्याय वापरू शकते काय, या चिंतेने जगाला सध्या ग्रासले आहे. अण्वस्त्रांचा वापर झाला तर त्याची व्याप्ती जागतिक स्तरावर वाढू शकते. रशिया-युके्रन युद्धाला पूर्ण विराम मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. सोमवारच्या पहाटे रशियाने युक्रेनच्या ३५ शहरांवर एकाच वेळी बॉम्ब वर्षाव करून ती शहरे बेचिराख करून टाकली. रशियन बॉम्बवाहक विमानांनी हवाई हद्द ओलांडून युक्रेनवर हल्ले चढवले. युक्रेनची राजधानी कीववर सर्वाधिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. रशियाच्या या हल्ल्यात युक्रेनचे १० ऊर्जा प्रकल्प, १५-२० पाणीपुरवठा केंद्रे, दवाखाने, औद्योगिक आस्थापना उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे.
आतापर्यंत युक्रेनच्या पूर्व भागातील शहरांवर लक्ष केंद्रित केलेल्या रशियाने अचानक पश्चिम भागातील लुत्सक शहराला लक्ष्य केल्याने सारेच जण आश्चर्यचकित झाले. या भीषण हल्ल्यामुळे युक्रेनची जबर हानी झाली असावी, असा अंदाज आहे. पहाटे झालेल्या या भीषण हल्ल्याने एखादा देश पार खचून गेला असता; परंतु गेली अडीच वर्षे जगाला अचंबित करणा-या युक्रेनने रशियाच्या सारातोव्ह शहरातील एका उंच रहिवासी इमारतीवर ड्रोन हल्ला करून जोरदार पलटवार केला. युक्रेनचा हा ड्रोन हल्ला इतका भेदक होता की, क्षणभर अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली. युक्रेनसारखा चिमुकला देश रशियासारख्या महाशक्तीला आतापर्यंत तरी पुरून उरला आहे. एकमेकांशी संघर्ष करीत असलेल्या या देशांमध्ये शांतता अथवा तडजोड करण्यासाठी जागतिक पातळीवरून अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाहीत. संयुक्त राष्ट्र संघटनाही पुढाकार घेताना दिसत नाही. जगातला कोणताही प्रश्न चर्चेने सुटू शकतो या धारणेला या युद्धात तिलांजली मिळाली आहे. नमते कोणी घ्यायचे यावर तडजोडीचे प्रयत्न अवलंबून आहेत. इस्रायल आणि त्याचे शत्रू, रशिया आणि युक्रेन हे सारेच जण एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागला पाहिजे अशा निकरावर आले आहेत आणि बाकीचे जग निवांत बसून सारा संहार बघत बसले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले; परंतु दुर्दैवाने त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली; परंतु या चर्चेनंतर दोन्ही देशांमधील एकमेकांवरील हल्ले आणखीनच तीव्र झालेले पहावयास मिळाले. मोदींनी रशियन अध्यक्ष पुतीन यांना मारलेली मिठी युक्रेनला खुपलेली दिसली. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी मोदींच्या कृतीवर थेट शब्दांत आक्षेप घेतला. मोदींची ही कृती म्हणजे शांतता प्रक्रियेवरचा विनाशकारी हल्ला, अशी प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी दिली. थोडक्यात मोदींच्या प्रयत्नांना दोन्ही देशांनी जराही दाद न दिल्याने बाकीच्या देशांची आपण या भानगडीत न पडलेलेच बरे, अशी धारणा झाली असावी. दोन्ही ठिकाणचा संघर्ष त्यांच्या पुरताच मर्यादित न राहता त्याची व्याप्ती जागतिक स्तरावर वाढण्याचा जो धोका निर्माण झाला आहे तो अधिक चिंताजनक आहे. युक्रेन भेटीत पंतप्रधान मोदी यांनी शांततेचा संदेश आणि मानवतावादी पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी त्यांचे कौतुक केले आहे. मोदी यांनी कीव येथे भेट दिल्यानंतर मुत्सद्देगिरीद्वारे शांतता लवकर प्रस्थापित करण्याच्या शक्यतांवर चर्चा केली.
युक्रेन आणि रशियाने युद्ध संपवण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सक्रीय भूमिका बजावण्यास भारत तयार आहे, असे मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी युक्रेनमधील भेटीबाबत चर्चा केली तसेच युक्रेनबरोबरच्या संघर्षावर लवकर, कायमस्वरूपी आणि शांततापूर्ण ठरावास पाठिंबा देण्याच्या भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उपायांवरही चर्चा केली, असे मोदी यांनी म्हटले आहे. रविवारी इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्षाला अचानक मोठे स्वरूप प्राप्त झाले. लेबनॉनमधील हेजबुल्ला संघटनेने इस्रायलवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्रे डागली. मध्य पूर्वेत इस्रायलच्या विरोधात पॅलेस्टाईनमधील हमास, लेबनॉनमधील हेजबुल्ला आणि येमेनमधील हौथी यांनी संघटितपणे आघाडी उघडली.
त्याला इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डचीही मदत मिळण्याची शक्यता आहे. हमासच्या नेत्याची इस्रायलने इराणमध्ये हत्या केल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी इराणही टपलेले आहे. जगात संघर्ष पेटता ठेवणे हा अमेरिकेसारख्या काही मोठ्या राष्ट्रांचा आवडता खेळ असतो. कारण त्यांना त्यांची शस्त्रास्त्रे विकायची असतात त्यामुळे ते असा संघर्ष कसा पेटता राहिल याच प्रयत्नात असतात. वास्तविक पाहता संयुक्त राष्ट्राच्या संघटनेवर अमेरिकेचा मोठा प्रभाव आहे. अमेरिकेला हे व्यासपीठ वापरून संघर्ष आटोक्यात आणणे सहज शक्य आहे; परंतु अमेरिकेला त्यात स्वारस्य दिसत नाही. अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढती स्पर्धा हे कारणही त्या मागे असू शकते. आज प्रत्येक आंतरराष्ट्रीय विषयाकडे अमेरिका-चीन संघर्षाच्या चौकटीतूनच पाहिले जाते. आज जगापुढे तापमानवाढीचे भीषण संकट उभे असताना इतरत्र उद्भवणारी युद्धजन्य स्थिती आटोक्यात ठेवल्यास एकजुटीने नैसर्गिक संकटाला सामोरे जाणे शक्य होईल.