जालना : आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा पुढील १५ दिवसांत होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मराठा आंदोलनातील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत त्यांच्यावर जबरी टीका केली. जरांगेंच्या या भूमिकेवरुन हे आंदोलन राजकीय होत असल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे. त्यातूनच, भाजपा नेते आशिष जाधव यांनी मनोज जरांगेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अर्थात, त्यावर जरांगेंनी स्पष्टीकरणही दिले. मात्र, जालन्यात जरांगे विरुद्ध दानवे असा सामना रंगल्यास रावसाहेब दानवे जरांगेंचा पराभव करतीस असे केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी म्हटले आहे.
उपोषणकर्ते मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यातूनच जरांगे यांनी आगामी लोकसभानिवडणूक लढवावी अशी चर्चाही होत असून भाजपा नेते आशिष देशमुख यांनी तर, ते महाविकास आघाडीकडून जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचा दावाच केला होता. मात्र, राजकीय चर्चेबाबत आणि भूमिकेबाबत जरांगे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. तसेच, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन आणि आनंद आंबेडकरांच्या भेटीवरही त्यांनी मौन सोडले. माझा राजकीय मार्ग नाही असे म्हणत जरागेंनी भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे जालन्यात जरांगे निवडणुकीला उभे राहिल्यास रावसाहेब दानवे त्यांचा पराभव करतील असे केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी म्हटले आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून जरी मनोज जरांगे हे उभे राहिले तरी भाजपचे नेते रावसाहेब दानवेच पुन्हा निवडून येतील असे कराड यांनी म्हटले आहे. रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. मतदार संघात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यामुळे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उमेदवार असले तरीही रावसाहेब दानवे यांचा विजय पक्का आहे. रावसाहेब दानवे हे जरांगेंना घाबरणार नाहीत असे कराड यांनी म्हटले आहे.
निवडणुकीवर काय म्हणाले जरांगे?
आनंद आंबेडकर यांच्या भेटीवर भाष्य करताना, प्रकाश आंबेडकर यांचा शब्द डावलणे मला थोडे जड जाते. पण, माझे त्यांना आदरपूर्वक म्हणणे आहे. माझा सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे, सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळावे, याकडे आहे. माझा राजकीय मार्ग नाही, माझा सामाजिक मार्ग आहे. मी हा लढा समाजासाठी उभा केलेला आहे असे म्हणत राजकीय भूमिका घेणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.