सोलापूर : प्रतिनिधी
भिशी चालवून आणि स्वत:च्या फायनान्स कंपनीमध्ये जास्त व्याजाचे आमीष दाखवून १३२ ठेवीदारांना दोन कोटी ६९ लाख १९ हजार रूपयांचा गंडा घातल्या प्रकरणी एका दाम्पत्याविरूध्द सोलापुरात पोलिसांनी फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला.
रमेश अंबादास चिप्पा व त्याची पत्नी सुजाता चिप्पा (रा. खुशी रेसिडेन्सी, गीतानगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) अशी या गुन्ह्यातील आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. यात फसवणूक झालेल्या शिवाजी लक्ष्मण आवार (रा. साईबाबा चौक, सोलापूर) यांनी जेल रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार १ नोव्हेंबर २०२० ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला.
रमेश चिप्पा व त्याची पत्नी सुजाता यांनी श्री ओमसाई फायनान्स नावाची कंपनी सुरू केली होती. त्यासोबत भिशीही चालविली होती. भिशीच्या माध्यमातून सुरूवातीला चोख व्यवहार करून चिप्पा दाम्पत्याने सदस्यांचा विश्वास संपादन केला. नंतर या माध्यमातून संपर्कात आलेल्या मंडळींना श्री ओमसाई फायनान्स कंपनीत भरपूर व्याज देण्याचे आमीष दाखवून ठेवीच्या रूपात आर्थिक गुंतवणूक करण्याची गळ घातली. यातही सुरूवातीला जादा व्याज देऊन चिप्पा दाम्पत्याने ठेवीदारांना जास्त ठेवी जमा करण्यासाठी आकृष्ट केले. जास्त व्याजाच्या आकर्षणापोटी १३२ व्यक्तींनी मिळून दोन कोटी ६९ लाख १९ हजारांएवढ्या रकमेची ठेव स्वरूपात गुंतवणूक केली. नंतर चिप्पा दाम्पत्याने ठेवीवरील व्याज देण्यास टाळाटाळ सुरू केली.
ठेवीची रक्कम परत मिळण्यासाठी तगादा लावणा-या ठेवीदारांना केवळ भूलथापा देऊन चालढकल केली जात होती. ठेवीदारांनी सतत जोर लावला असता चिप्पा दाम्पत्याने, आम्ही आत्महत्या करतो आणि त्यास तुम्ही सगळे ठेवीदार जबाबदार राहतील, अशा धमक्या दिल्या. शेवटी शिवाजी आवार या ठेवीदाराने इतर ठेवीदारांना एकत्र आणून चिप्पा दाम्पत्याविरूध्द पोलिसांत धाव घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.