लातूर : प्रतिनिधी
पोलीस दलातील पोलीस कर्मचा-यांच्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासली जावी तसेच त्यांच्यातील कलागुणांचा विकास व्हावा या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात दि. २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा शनिवार दि. ३० नोव्हेंबर रोजी बाभळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला.
या स्पर्धेसाठी पोलीस मुख्यालय, चाकूर उपविभाग, अहमदपूर उपविभाग, निलंगा उपविभाग अंतर्गत येणा-या पोलीस स्टेशनचे पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य उपमाहानिरीक्षक अमीरूल हसन अन्सारी हे होते. यावेळी मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य तथा उपमहानिरीक्षक अमीरूल हसन अन्सारी यांनी ताणतणावमुक्त जीवनशैलीसाठी खेळांची आवड जोपासली पाहिजे, प्रत्येक पोलीस हा शारीरिक व मानसिक दृष्ट्या मजबूत व कणखर असणे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या परिस्थितीमुळे पोलिसांचे त्यांचे समोरील आव्हाने व त्यांचे स्वरूप बदलले आहेत. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य खिलाडी वृतीने, आव्हाने स्वीकारून पार पाडावे. आज इतर विभागापेक्षा पोलीस विभागावर मोठी जबाबदारी असल्याने प्रत्येक युनिफॉर्म मधील अधिकारी व कर्मचारी यांनी लोकशाही, शाशनाप्रती, जनतेप्रती एकनिष्ठ राहून कर्तव्य पार पाडावे असे सांगितले.
पोलीस मुख्यालय मैदानावर तीन दिवसात फूटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कब्बडी तसेच १००, २००, ४०० व ८०० मिटर धावणे, गोळाफेक, लांबउडी, भाला फेक, थाळी फेक, तायक्वांदो आदी स्पर्धा पार पडल्या. शनिवारी उर्वरित स्पर्धा घेऊन त्यानंतर समारोप कार्यक्रम घेण्यात आला. संगीत खुर्चीमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी प्रतिज्ञा साळुंखे व भाग्यश्री चौधरी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवला तर १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत महिला पोलीस अंमलदार अश्विनी जाधव व पल्लवी चित्तलवाड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय बक्षीस मिळवले. पुरुष पोलीस कर्मचा-यांसाठी १०० मिटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये सागर जाधव यांनी प्रथम व प्रेमानंद कांबळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. पोलीस मुख्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. उत्कृष्ठ महिला खेळाडू व पुरुष खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
सदर क्रीडा स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस उपाधीक्षक गृह गजानन भातलवंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) रणजीत सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी (अहमदपूर) मनीष कल्याणकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (औसा) चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी (निलंगा) नितीन कटेकर, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शाखाप्रमुख यांची उपस्थिती होती.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक शेख गफ्फार, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, क्रीडा प्रमुख रामलिंग शिंदे, युसुफअली धावडे, प्रशांत स्वामी, अन्वर शेख, प्रशिक्षक भारती, सय्यद, गडेराव यांनी परिश्रम घेतले. क्रीडा स्पर्धा पारदर्शक पार पडण्याकरीता इतर विभागातील कार्तिक मस्के,अमजद शेख, समीर शेख, साहिल समुद्रले, योगेश स्वामी,प्रकाश आयरीकर ,सोपान रुक्मे, रुपाली कांबळे, अमर सूर्यवंशी, समाधान बुर्गे, धनंजय नागरगोजे, बोबडे, महेश पाळणे यांनी पंचाची भूमिका पार पाडली. क्रीडा स्पर्धाचे संपूर्ण छायाचित्र पोलीस अमलदार रियाज सौदागर व सुहास जाधव यांनी केले. बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गालिब शेख यांनी केले. सदर क्रीडा स्पर्धेस खेळाडू, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.