28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeलातूरजिल्ह्यातील चार वसतिगृहात ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलीं मिळणार प्रवेश 

जिल्ह्यातील चार वसतिगृहात ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलीं मिळणार प्रवेश 

लातूर : प्रतिनिधी
ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होण्यासाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात मुला-मुलींसाठी प्रत्येकी दोन अशी एकूण चार वसतिगृहे मंजूर असून या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समाज कल्याण विभागाच्या विविध समितींच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. समाज कल्याण सहायक आयुक्त्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त्त शुभम क्यातमवार, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. कलमे आदी यावेळी उपस्थित होते.
स्थलांतरीत होणा-या ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी शासनाने अशा मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आणि त्यांच्या पाल्यांची माहिती शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागाने तातडीने संकलित करून त्यांची नोंदणी करुन घ्यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.  समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्या. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सुविधा, विरंगुळा केंद्राची सुविधा उपलब्ध करून द्यावी. यासोबतच त्यांच्या अनुभवाचा फायदा विधायक कार्यासाठी होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.  जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, जिल्हास्तरीय जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम समिती, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती, मुख्यमंत्री वयोश्री योजना आदी समितींचाही जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. समाज कल्याण सहायक आयुक्त चिकुर्ते यांनी माहितीचे सादरीकरण केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR