लातूर : प्रतिनिधी
गेल्या १५ वर्षांपासून जिल्ह्यातील ४५ हायस्कुलमध्ये मुख्याध्यापकच नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापकांची पदे भरावीत, तसेच सदर पदांचा अतिरिक्त पदभार सांभाळणा-या माध्यमिक शिक्षकांना मासिक वेतनाबरोबर विशेष वेतन द्यावे, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने प्रधान सचिव ग्रामविकास मंत्रालय मुंबई, प्रसाधन सचिव, शालेय शिक्षणए व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई, अवर सचिव, सामान्य प्रशासन मंत्रालय मुंबई व लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.
लातूर जिल्ह्यात एकुण ५० माध्यमिक सरकारी हायस्कुल आहेत. ते चालविण्यासाठी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. संच मान्यता २०२३-२०२४ नूसार ५ हायस्कुलमध्ये अराजपत्रित मुख्याध्यापक आणि ४५ हायस्कुलमध्ये राजपत्रित मुख्याध्यापक वर्ग-२ ची पदे मान्य आहेत. तसेच ४५ हायस्कुलमधील राजपत्रित मुख्याध्यापक वर्ग-२ ही पदे १५ वर्षांपासून रिक्त आहेत. त्या पदांचा अतिरिक्त पदभार त्याच हायस्कुलमधील सेवाज्येष्ठ माध्यमिक शिक्षकांकडे प्रभारी म्हणून दिलेला आहे.
जिल्ह्यातील हायस्कुलच्या राजपत्रित मुख्याध्यापकांची ४५ पदे भरली नसल्याने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना अध्यापनाबरोबरच प्रशासनाचा अतिरिक्त कामाचा ताण विनावेतन सोसावा लागत आहे. जिल्ह्यातील ४५ हायस्कुलमधील राजपत्रित मुख्याध्यापक वर्ग-२ रिक्त असलेली पदे भरावीत आणि पुर्वलक्षी प्रभावाने मुख्याध्यापकांचा अतिरिक्त पदभार सांभाळत असलेल्या माध्यमिक शिक्षकांना मासिक वेतनाबरोबर विशेष वेतन १५०० रुपये द्यावे, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव के. व्ही. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष एस. जे. रितपूरे, कार्याध्यक्ष एम. डी. शिंदे, जे. पी. महालिंगे, एम. पी. गुंडरे, टी. एन. पंडित, एस. जी. गिरी यांनी केली आहे.