31.8 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeलातूरजिल्ह्यात बनावट रासायनिक खत दाखल

जिल्ह्यात बनावट रासायनिक खत दाखल

लातूर : विनोद उगीले
बनावट बियाणे किटक नाशके या नंतर आता बनावट डि.ए.पी.सह आदी रासायनिक खते शेतक-यांच्या माथी मारून शेतक-यांसह अधिकृत खत विक्रेत्यांना आर्थिक गंडा घालणारी टोळी लातूर जिल्हयात दाखल झाली आहे. याकडे संबंधीत कृषी विभागाचे साफ दुर्लक्ष असून हा दिवसाढवळया प्रकार सुरू असताना झोपेचं सोंग घेतलेल्या कृषी विभागाकडून कारवाईचे कसलेच पाऊल उचलले जात नसून यासंदर्भात जिल्हा परिषेदचा कृषी विभाग मात्र सर्तक झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी केलेल्या कारवाईतून अहमदपूर तालुक्यातील एका कृषी केंद्रचालका विरोधात बनावट डिएपी यत विक्री केल्या प्रकरणी गुन्हा दाखल दाखल केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बनावट बियाणे व किटक नाशकामुळे चर्चेत आलेल्या लातूर जिल्ह्यात विविध कंपनीची बनावट डि.ए.पी व आदी रासायनिक खते तयार करून ती ही अधिकृत कंपनीच्या दरापेक्षा २०० ते २५० रूपये कमी किमती शेतक-यांच्या माथी मारण्याचा प्रकार लातूर जिल्ह्यात दिवसा ढवळया सुरू आहे. यावर शासनाच्या कृषी विभागाच्या अधिका-यांचे नियंत्रण हवे असताना हा प्रकार लक्षात येवून ही संबंधीत कृषी अधिकारी यांकडे कानाडोळा करीत असल्याने शेतक-यांची फसवणूक तर होतंच आहे शिवाय या खताची कमी दरात विक्री होत असल्याने याचा फटकाही जिल्ह्यातील नामांकित अधिकृत रासायनिक खत विक्रेत्यांना बसत आहे. असे असतानाच  विशिष्ट कंपनीचा डीएपी खत आहे असे भासवून अनेक शेतक-यांना बनावट खत विक्री केल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने किनगाव येथील माऊली कृषी सेवा केंद्र चालक नामदेव विश्वनाथ खेरडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मौजे सारोळा, ता. रेणापूर व परिसरातील गावांमधून पीपीएल कंपनीचा डीएपी खत म्हणून बनावट खत विक्री केल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाने मौजे सारोळा, ता. रेणापूर येथील एका शेतक-यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या पीपीएल कंपनीची डिएपी टाऊनशिप प्रदिप नावाचा लोगो असलेली १८. ४६. ०. खताचे ५० किलोचे ४० पोते अंदाजे किंमत ५४ हजार रूपये पंचासमक्ष तपासले. तेंव्हा हा खत पीपीएल कंपनीचा नसल्याचे त्यासाठी वापरण्यात आलेल्या पोत्यावरून लक्षात आले. याची चौकशी संबंधीत शेतक-यांकडे केली असता त्या शेतक-याने असा हा सर्व खत मला, माझे गाव व परिसरातील गावच्या शेतक-यांना किनगाव, ता. अहमदपूर येथील माऊली कृषी सेवा केंद्राचे चालक नामदेव विश्वनाथ खेरडे यांनी दिल्याचे सांगितले. त्यानंतर खेरडे याच्या विरोधात किनगाव पोलिसांत लातूर जि.प. तील खत निरीक्षक तथा मोहीम अधिकारी मिलींद भागवत बीडबाग यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसांत फसवणूक व अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने शेतक-यांना बनावट खत विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR