लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यात २६ हजार २३६ नवीन वाहने नोव्हेंबर अखेरपर्यंत रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे आता घरात सदस्यपर वाहन दिसून येत आहे. नोकरदार पती-पत्नी आणि कॉलेजला जाण्यासाठी आता मुलांना स्वतंत्र वाहन घरच्यांकडून मिळत आहे. दुचाकी खरेदी करणे आता फार अवघड न राहिल्याने ‘ईएमआय’ सुविधेवर सर्वसामान्य नागरिक सहज दुचाकी खरेदी करू लागला आहे. घराच्या पार्किंगमध्ये एकच गाडी असे चित्र फार क्वचीतच बघायला मिळत आहे.
मोटरसायकल, स्कूटर, मोपेड सोय म्हणून नाही, तर गरज म्हणून वापरली जाते. कुठे गावाला, पर्यटनाला जायचे असल्यास स्वत:चे चारचाकी वाहन हवे म्हणून चारचाकी घेण्याला पसंती दिली जाते, तर तरुणांना महाविद्यालयात जाण्यासाठी पालक पब्लिक ट्रान्स्पोर्टपेक्षा वाहन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. ब-याचदा घराजवळ पार्किंग नसल्याने अनेकांना परवानगी घेऊन इतरांच्या जागेवर गाडी पार्किंग करावी लागत आहे. शहरात रस्ते अरुंद आणि वाहनांची संख्या वाढत असल्याने प्रदूषण, ट्राफिक आणि पार्किंगची मोठी समस्या भविष्यात निर्माण होणार आहे.
दरम्यान, ट्राफिकचे नियम न पाळणे, सिग्नल मोडणे, हेल्मेट न वापरणे या नियमांकडे लातूरकर सर्रास दुर्लक्ष करतात. सिग्नलवर काही सेकंद थांबू न शकणारी मंडळी अपघाताला स्वत:हून निमंत्रण देतात. हॉर्न वाजवला, कट मारला, धक्का लागला यावरून किरकोळ वाद ते हाणामारीपर्यंतच्या घटना वारंवार घडत आहेत.