22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरजि.प. समोरचा अतिक्रमित परिसर झाला मोकळा, १० ते १५ खोक्यांवर कारवाई

जि.प. समोरचा अतिक्रमित परिसर झाला मोकळा, १० ते १५ खोक्यांवर कारवाई

सोलापूर :
जिल्हा परिषदेसमोरील अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आलेली खोकी पोलिसांच्या बंदोबस्तात जेसीबीद्वारे काढण्यात आली. १० ते १५ खोकी जेसीबीने काढण्यात आली. यावेळी व्यापारी आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख बनसोडे यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी बनसोडे हे सकाळी दहा वाजल्यापासूनच जिल्हा परिषदेसमोर पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये येऊन थांबले होते. यावेळी अतिक्रमणधारकांनी प्रचंड विरोध केला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू बेळेनवरू यांनी पोलिस आणि महापालिकेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे याठिकाणी आले. त्यांनीही चर्चा केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या तक्रारीवरून आम्ही अतिक्रमण काढत असल्याचे सांगितले. तेव्हा चेतन नरोटे हे सीईओ आव्हाळे यांना भेटण्यास गेले असता त्या कार्यालयात नव्हत्या. नंतर चेतन नरोटे हे पोलिस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले. त्यानंतर पोलिस उपायुक्त विजय कबाडे हे आल्यानंतर त्यांनी तत्काळ अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाली. झेरॉक्सचे गाळे, चहाची टपरी यासह विविध अतिक्रमित खोकी काढण्यात आली. या कारवाईवेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

जिल्हा परिषद येथील अतिक्रमण करून केलेले गाळे तक्रारीवरून काढण्यास सुरुवात झाली. यावेळी येथील खोकेधारक अनिल पाटील हे पोलिस, महापालिका अधिकाऱ्यांसोबत वाद घालत असताना अचानक चक्कर येऊन जागेवरच पडले. यावेळी एकच गोंधळ उडाला होता. त्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून दवाखान्यात नेण्यात आले.महापलिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करीत असताना खोकीधारकांची मोठी धावपळ उडाली. टेबल, खुर्ची, कॉम्प्युटर, इतर साहित्य काढण्यासाठी लगबग दिसून आली.

जिल्हा परिषदेसमोरील गाळे काढा, अशी तक्रार प्राप्त झाल्यामुळे अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. तब्बल १० ते १५ खोकी जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. खोकेधारकांनी विनाकारण वाद न घालता आपली खोकी काढून घ्यावीत; अन्यथा पुढील आठवड्यात पुन्हा कारवाई करणार आहे. असे मनपा अतिक्रमण प्रतिबंधक विभागप्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR