22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीयजीवघेणा हल्ला!

जीवघेणा हल्ला!

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. पेनसिल्व्हेनिया राज्यातील एका निवडणूक प्रचार सभेत झालेल्या हल्ल्यात ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली. या गोळीबारात सभास्थानी असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. आजी-माजी राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सिक्रेट सर्व्हिसेसच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला. २० वर्षीय हल्लेखोराचे नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स असे आहे. व्यासपीठावर ट्रम्प यांचे भाषण सुरू असताना गोळ्या झाडल्याचा आवाज झाला.

घटनास्थळी एकच आरडाओरड अन् गोंधळ सुरू झाला. ट्रम्प यांनी उजव्या कानाजवळ हात नेला आणि ते खाली वाकले. गोळी कानाला चाटून गेल्याने त्यांचा कान आणि चेहरा रक्ताने माखला. गोळीबार झाल्याचे लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी ट्रम्पभोवती कडे केले आणि त्यांना स्टेजवरून खाली नेले. तेथून जात असताना ट्रम्प रक्ताने माखलेल्या हाताची मूठ वळवून ‘फाईट’ असा निर्धार व्यक्त करत होते. कदाचित ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असेही त्यांना म्हणावयाचे असेल. ट्रम्प यांच्यावर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. त्यांनी आपला जीव वाचवणा-या सुरक्षा रक्षकांचे आभार मानले तसेच अमेरिकन जनतेला एकजूट राहण्याचे आवाहन केले. जीवघेण्या हल्ल्यातून ट्रम्प सुखरूप वाचले असले तरी आपल्या नेत्यांना सर्वोत्तम सुरक्षा व्यवस्था पुरवणा-या अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हल्लेखोराबाबत सुरक्षा रक्षकांना माहिती देण्यात आली होती; परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. हल्लेखोराने सभा स्थानावर असलेल्या इमारतीच्या छतावरून गोळीबार केला होता. त्याला छतावर जाताना पाहिले होते, असेही काही जणांचे म्हणणे आहे. हल्लेखोर ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाचा नोंदणीकृत उमेदवार होता. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत माथेफिरूंकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार या पूर्वी अनेक वेळा घडले आहेत. सध्या अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आगामी नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार, वर्तमान अध्यक्ष ज्यो बायडन यांना रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे आव्हान असणार आहे. अमेरिकेत निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून दोन्ही उमेदवारांनी प्रचार सभांची राळ उडवून दिली आहे मात्र, आता ट्रम्प यांच्यावर भर प्रचार सभेत गोळीबार झाल्याने अमेरिकेतील लोकशाही आणि कायदा व सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या बायडन यांच्या विरोधात वातावरण असल्याचे बोलले जात आहे. मुळात बायडन यांनीही पडद्यामागून ट्रम्प यांना वैयक्तिक प्रकरणात गुंतवून त्रास देण्याचा प्रयत्न चालवल्याचे म्हटले जात आहे.

बायडन वयोवृद्ध असून त्यांचा विसरभोळेपणा वाढत चालल्याचा आरोप विरोधक करत आहेत. नुकतेच बायडन यांनी कमला हॅरिस यांना ‘उपाध्यक्ष ट्रम्प’ आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना ‘राष्ट्रपती पुतीन’ असे संबोधले होते, असो. अमेरिकेत सध्या जे काही चालले आहे किंवा घडते आहे ते सारे भयावह आणि चिंताजनकच म्हणावे लागेल. दुस-या देशात नाक खुपसून तेथील सत्ताकारणाला बाहुल्यासारखे खेळवणारा अमेरिका सध्या स्वत:च एक खेळणे होऊन बसला आहे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. रशिया-युक्रेन युद्धामुळे ते अधिकच स्पष्ट झाले आहे. दुस-याला नामोहरम करण्याच्या सवयीमुळे अमेरिका आतून पोखरत चालली आहे हे सध्याच्या घटनांवरून स्पष्ट होत आहे त्यामुळे महासत्ता अशी ओळख असणारी अमेरिका ती हीच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यातील बटलर शहरात घडलेल्या राजकीय हिंसाचाराच्या धक्कादायक घटनेमुळे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील प्रचार मोहिमेवर परिणाम होणे अपरिहार्य आहे. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याकडे हत्येचा प्रयत्न म्हणूनच पाहिले जात आहे त्यामुळे एकमेकांशी फारसे सहमत नसलेल्या सर्वच राजकीय पक्षांतील राजकारणी या हल्ल्याच्या निषेधासाठी आणि लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला स्थान नाही हे सांगण्यासाठी एकत्र येत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू बुश, बिल क्लिंटन, जिमी कार्टर या सर्वांनी या हिंसाचाराचा तात्काळ निषेध केला. अशा प्रकारच्या हिंसाचाराला अमेरिकेत स्थान नाही.

देशाला एकसंध ठेवण्याची गरज आहे हे यावरून दिसून येते, असे अध्यक्ष बायडन यांनी म्हटले आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामुळे आपण चिंतीत आहोत, असे म्हटले आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. मी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो, असे मोदी म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा समाज माध्यमातून निषेध केला आहे. हत्येचा प्रयत्न होणे ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यामुळे अमेरिकेतील सामाजिक आणि सांस्कृतिक सलोख्याला छेद गेला आहे. राजकारणातील सुरक्षा आणि सुरक्षिततेबद्दल निर्माण झालेला भ्रमही दूर सारला गेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR