आळंदी : वृत्तसंस्था
श्री संत ज्ञानोबा-तुकोबा विश्वभ्रमण दिंडीचे लंडन येथे भारतीय बांधवांनी मोठ्या भक्तीभावे स्वागत केले. विश्वभ्रमण दिंडीचे हे दुसरे वर्ष आहे. यावर्षी श्री ज्ञानोबा तुकोबांच्या पादुकांसह स्वामी समर्थांच्या पादुकाही हरिनाम गजरात लंडनला नेण्यात आल्या.
नोकरीनिमित्त विदेशात राहणा-या भारतीयांना संतांच्या पादुकांचे प्रत्यक्ष दर्शन घडावे, त्यांना वारकरी कीर्तन, भजनाचा आनंद मिळावा यासाठी सदर दिंडीचे आयोजन केले जात आहे. यापूर्वी पहिल्यांदा २०२२ मध्ये दुबईला विश्वभ्रमण दिंडी नेण्यात आली होती. त्यावेळी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. इतर देशांत राहणा-या भारतीय भाविकांनी त्यांनाही संतांच्या पादुकांचे दर्शन व्हावे अशी इच्छा व्यक्त केल्याने यावर्षी लंडनला दिंडीचे आयोजन केले.
तीर्थक्षेत्र आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात अभिषेक, मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. लंडन येथे हिथ्रो विमानतळावर स्लॉव्ह मित्र मंडळ स्लॉव्ह साव्ह लंडन यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष मंदार मिराशी, आनंद पंडित, देसाई साहेब, सागर ंिखंडारे व सागर कुलकर्णी यांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. लंडन येथे पादुकांना अभिषेक, पूजा व महाआरती करून संगीत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधीपती संतोष कुलकर्णी व श्रीमंत दादासाहेब करांडे व राहुल कराळे यांनी दिली.