22.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeराष्ट्रीयज्यांनी आम्हाला मतदान केले नाही, त्यांचे काय होणार?

ज्यांनी आम्हाला मतदान केले नाही, त्यांचे काय होणार?

भाजप खासदाराच्या विधानामुळे नवा वाद

नवी दिल्ली : अंदमान आणि निकोबारमधील नवनिर्वाचित भाजप खासदार विष्णू पाडा रे यांच्या भाषणाचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. या व्हीडीओमध्ये विष्णू पाडा रे हे मत न देणा-या लोकांना धमकावत असल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हीडीओतील भाषणात खासदार विष्णू पाडा रे म्हणाले की, लोकांची कामे पूर्ण होतील, पण ज्यांनी आम्हाला मतदान केले नाही, त्यांचे काय होणार? फक्त विचार करा. दरम्यान, विष्णू पाडा रे यांनी शुक्रवारी दावा केला की, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे.

याबाबत विष्णू पाडा रे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मागील काँग्रेस सरकारच्या काळात निकोबारमधील गैरकारभार आणि भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधत असल्याचे विष्णू पाडा रे यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी असाही दावा केला की, माझे विधान अशा लोकांच्या विरोधात होते, ज्यांनी निवडणुकीदरम्यान माझ्या निकोबारच्या बंधू-भगिनींची दिशाभूल केली होती. त्यामुळेच मी म्हणालो सीबीआय येईल…नक्की येईल…विचार करा भाऊ. याचबरोबर, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि गैरसमज झाला, हे दुर्दैवी आहे.

मागील काँग्रेस सरकारच्या काळात निकोबार जिल्ह्यातील गैरकारभार आणि भ्रष्टाचार मी निदर्शनास आणून दिला, असे विष्णू पाडा रे यांनी सांगितले. तसेच, निकोबारमधील आदिवासी लोकांना कथितपणे धमकावल्याबद्दल विचारले असता विष्णू पाडा रे म्हणाले, माझे भाषण कधीही त्यांच्या विरोधात नव्हते. ते खूप निष्पाप आहेत. ज्यांनी काँग्रेसच्या आधीच्या खासदारांसाठी काम केले होते आणि भ्रष्ट कारभारात गुंतले होते, त्यांना मी फक्त इशारा दिला होता. त्यांनी मतदारांना प्रभावित केले.

कुलदीप राय शर्माचा पराभव
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विष्णू पाडा रे यांनी अंदमान आणि निकोबारमधील एकमेव लोकसभेच्या जागेवर विजय मिळवला. विष्णू पाडा रे यांनी काँग्रेसचे उमेदवार कुलदीप राय शर्मा यांचा जवळपास २४,००० मतांच्या फरकाने पराभव केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR