न्यू जर्सी : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खास असलेले उद्योगपती एलन मस्क यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेच्या सरकारमध्ये दक्षता विभागाचे प्रमुख पद सांभाळणारे मस्क यांच्याविरोधात जगभरात विरोध प्रदर्शन आणि टेस्ला कार तसेच टेस्लाच्या अन्य वाहनांची जगभर जाळपोळ सुरू आहे.
शनिवारी हजारो लोक रस्त्यावरून उतरून एलन मस्क यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. टेस्ला कंपनीची वाहने जिथे दिसतील तिथे लोकांनी पेटवून दिली. यात ब-याच कार जळून खाक झाल्या. फक्त अमेरिकेतच नव्हे तर ब्रिटन, जर्मनीतही मस्क यांच्याविरोधात लोकांनी नाराजी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, ‘डॉज’प्रमुख म्हणून मस्क यांनी आखलेल्या धोरणाविरोधात लोकांनी आंदोलनाचं पाऊल उचलले आहे.
मस्क यांनी या विभागाचे कामकाज सांभाळताना संवेदनशील माहिती मिळवली आणि सरकारी खर्च कपात करण्याच्या बहाण्याने अनेक एजन्सी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यातून कित्येक लोक बेरोजगार झाले. लाखो कुटुंबावर ट्रम्प यांच्या धोरणाचा परिणाम झाला. एलन मस्क यांच्या निर्णयाविरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे लोक आता रस्त्यावर उतरून मस्क यांच्या संपत्तीला टार्गेट करत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले एलन मस्क यांच्या ३४० बिलियन डॉलर संपत्तीत सर्वात मोठा हिस्सा टेस्ला कंपनीचा आहे.
अमेरिकेतली मेंटेस्ला येथे सर्व २७७ शोरूम आणि सेंटरबाहेर लोकांचा जमाव जमला. टेक्सास, न्यूजर्सी, मॅसाचुसेट्स, कनेक्टिकट, न्यूयॉर्क, मिनेसोटा आणि अमेरिकेच्या अनेक भागात टेस्ला डिलरशिपच्या ठिकाणी जमावाने मस्क यांच्याविरोधात आंदोलन केले. दरम्यान, वाढत्या विरोधानंतर एलन मस्क हे ट्रम्प यांची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी दिलेले डिपार्टमेंट ऑफ गर्व्हनमेंट एफिशिएंसी हे पद मस्क सोडणार आहेत. मस्क यांच्या या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसणार आहे. मस्क यांनी हा निर्णय अशावेळी घेतला आहे जेव्हा अमेरिकेचे नुकसान १ ट्रिलियन डॉलरपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती.