28.7 C
Latur
Saturday, March 1, 2025
Homeअंतरराष्ट्रीयट्रम्पने झेलेंस्कीला झापले; शांतता कराराला तडका!

ट्रम्पने झेलेंस्कीला झापले; शांतता कराराला तडका!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्यात एक साधी भेट होती, मात्र त्याचे रुपांतर वादात झाले. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी या भेटीत थेट झेलेंस्की यांच्यासमोर युद्धाचा मुद्दा छेडला. या आरोपाची री ओढत ट्रम्प यांनी सांगितलं की, झेलेंस्की यांना शांतता नको आहे आणि जर त्यांना ऐकायचं नसेल तर अमेरिका या युद्धातून बाहेर पडेल. यावर झेलेंस्की यांनी उत्तर दिलं की, आम्हाला हमीसह युद्धबंदी हवी आहे. पण प्रकरण इथेच शांत होईल असं शक्य नाही. यामुळे आता नव्या युद्धाच्या बिजाची पेरणी होत असल्याचं दिसत आहे.

खरं तर दोन्ही देशाचे अध्यक्ष मौल्यवान खनिजाबाबत करार करण्यासाठी एकत्र आले होते. यासाठीच झेलेंस्की यांचा अमेरिका दौरा होता. पण दोन्ही देशात शांततापूर्ण करार होण्याऐवजी भलतंच घडलं. झेलेंस्की यांनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी शांतीवार्ता करताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही. असं त्यांनी सांगताच तिथेच माशी शिंकली. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स म्हणाले की, हे युद्ध राजनैतिक पद्धतीने सोडवता येईल. असं बोलल्यानंतर वादाला फोडणी मिळाली.

ट्रम्प यांनी झेलेंस्की यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं. ट्रम्प म्हणाले की, युक्रेन संकटात आहे. तुम्ही हे युद्ध जिंकू शकत नाहीत. पण आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणून तुम्हाला एक संधी आहे. तुम्ही यातून बाहेर येऊ शकता. आम्ही तुम्हाला ३५० अब्ज डॉलर दिले आहेत. सैन्य उपकरणं दिली. जर आम्ही तुम्हाला ही मदत केली नसती तर हे युद्ध दोन आठवड्यातच संपलं असतं.

ट्रम्प यांनी पुढे सांगितलं की, तुमच्या मनात पुतिन यांच्याबाबत तिरस्कार आहे. दुस-या बाजूनेही तुम्हाला पसंती मिळेल असं वाटत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की, मी कणखर व्हावे असे वाटत असेल तर मी जगातील इतर कोणापेक्षाही कणखर होऊ शकतो. पण तुम्ही अशा प्रकारे कोणतीही डील करू शकत नाही. यावर झेलेंस्की यांनी उत्तर दिलं आणि म्हणाले, आम्हाला हमीसह युद्धबंदी करार हवा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांच्यातील वाद पाहून व्हाईट हाऊसमध्ये भयाण शांतता पसरली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR