नाशिक : प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाशिकचा दौरा ख-या अर्थाने फलद्रुप ठरला. यावेळी शिवसेनेत जोरदार इनकमिंग झाले. निवडणुकीच्या धामधुमीतच त्यांनी एकाच वेळी भाजप, मनसे आणि विरोधकांना मोठा झटका दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची आज नाशिकला सभा होत आहे. मात्र त्यांच्या या दौ-याच्या पूर्वसंध्येलाच मनसेला जोरदार सेटबॅक बसला. माजी महापौर अशोक मुर्तडक यांसह विविध पदाधिका-यांनी राज ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. हा पक्षप्रवेश म्हणजे नाशिकमधील भविष्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचे संकेत मानले जातात.
शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकला सभा झाली. ही सभा उद्धव ठाकरे यांना सातत्याने राजकीय लक्ष्य करणा-या भारतीय जनता पक्ष आणि मनसेला मोठा धक्का देणारी ठरली. विशेषत: विविध सत्तास्थाने काबीज केलेल्या भाजपला हा मोठा झटका मानला जातो. त्याचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर आणि निकालावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेत भाजपच्या माजी नगरसेविका इंदूबाई नागरे, पल्लवी पाटील, मधुकर हिंगमिरे तसेच औद्योगिक कामगार आघाडीचे अध्यक्ष विक्रम नागरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. मनसेच्या माजी महापौरांसह विविध नेत्यांनीही शिवबंधन बांधले. मनसेला गेले काही दिवस सतत गळती लागली आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधिका-यांत निरुत्साहाचे वातावरण आहे.