केंद्राकडून ३८५० कोटींच्या पॅकेजची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्रिमंडळाने डीएपीसाठी (डायअमोनियम फॉस्फेट) असलेल्या विशेष पॅकेजच्या विस्तारास मान्यता दिली. आजपासून या पॅकेजची अंमलबजावणी केली जाणार आहे. तब्बल ३८५० कोटी रुपये या पॅकेजसाठी दिले जाणार आहेत. शेतक-यांना परवडणा-या दरात डीएपीची उपलब्धता सुनिश्चित करणे या पॅकेज विस्ताराचा उद्देश आहे. या पॅकेजनुसार शेतक-यांना सध्याच्या एनबीएस (न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी) या योजनेसोबतच प्रतिटन ३ हजार ५०० रुपये प्रतिटन अनुदान मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकारच्या या महत्वपूर्ण पॅकेज विस्ताराची माहिती दिली.
केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारामधील चढउतार आणि सामरिक तणावामुळे हे पाऊल उचलण्यात आले. यामुळे शेतक-यांना स्वस्तात डीएपी खत मिळत राहणार आहे. ३,५०० रुपये प्रतिटन हे विशेष पॅकेज एनबीएस अनुदानाव्यतिरिक्त दिले जाईल. या पॅकेज विस्ताराच्या निर्णयामुळे शेतक-यांना लागणारी खते ही परवडणा-या दरात उपलब्ध होणार आहेत. या विशेष पॅकेजमुळे बाजारात डीएपीच्या किंमती स्थिर राहतील, असा सरकारने विश्वासही व्यक्त केला आहे. या पॅकेजची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली असून पुढील आदेश मिळेपर्यंत पॅकेजचा लाभ शेतक-यांना मिळणार आहे.
डीएपीएसह सुमारे
२८ खतांवर अनुदान
एप्रिल २०१० पासून यूपीए-२ च्या काळापासून एनबीएस योजनेंतर्गत शेतक-यांना डीएपीएसह सुमारे २८ प्रकारच्या फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवर अनुदान दिले जाते. सरकारकडून तब्बल १४ वर्षे हे अनुदान दिले जात आहे. या अगोदर जुलै २०२४ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीकरिता डीएपीएसाठी २,६२५ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर केले होते. या पॅकेजमुळे शेतक-यांना फायदा होणार आहे.